मुंबई Mumbai Crime News : तब्बल 40 वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीची मुंबई सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. आरोपी सध्या 70 वर्षांचा असून कथित पीडित तरुणीसोबत त्याचं लग्न होऊन त्यांना चार मुलं झाली होती. मात्र, आरोपी मुंबई पोलिसांना 40 वर्षांपासून सापडत नसल्यानं न्यायालयात प्रकरण सुरू होतं.
तरुणीच्या चुलत भावाची साक्ष : या प्रकरणात साक्षीदार असलेल्या पीडित तरुणीच्या चुलत भावाने आरोपी आणि पीडित तरुणी दोघांचं प्रेम प्रकरण होतं. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. तसंच त्यानंतर उत्तर प्रदेशातील आग्रा येथे स्थायिक झाल्याचं न्यायालयाला सांगितलं. तरुणीच्या आईनं या प्रकरणात तक्रार दाखल केली होती, मात्र ती अशिक्षित होती. त्यामुळे तिनं तक्रारीवर स्वाक्षरी केली नव्हती, असं सांगितलं.
महिला आणि पीडित मुलीचं निधन : या प्रकरणातील तक्रारदार महिला आणि तिच्या पीडित मुलीचंही यापूर्वीच निधन झालय. तसंच या जोडप्याला झालेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचं देखील निधन झालं आहे. गुन्हा नोंदवण्यात आलेल्या डीबी मार्ग पोलीस स्टेशनचे तत्कालीन हेड कॉन्स्टेबल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची देखील या प्रकरणात साक्ष झाली. मात्र, या गुन्ह्याच्या सिद्धतेसाठी आवश्यक असलेले कागदोपत्री पुरावे समोर आणण्यात तपास पथकाला यश आलं नाही. परिणामी कागदोपत्री हा गुन्हा सिद्ध होणं पुराव्याअभावी शक्य नसल्याचं मत न्यायालयानं नमूद केलं आणि आरोपीची या प्रकरणातून तब्बल 40 वर्षानंतर सुटका केली.
सन 1984 मध्ये तक्रार दाखल : हे प्रकरण अत्यंत जुनं असून या प्रकरणातील साक्षीदार अनुपलब्ध आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच आरोपी कोठडीत आहे. त्यामुळे प्राधान्याने हे प्रकरण निकाली काढण्यात आलं. 1984 मध्ये तक्रारदार महिलेनं तिची मुलगी बाथरूमसाठी जाते असं सांगून बाहेर गेली आणि गायब झाली अशी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आरोपी विरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. 1986 मध्ये आरोपी फरार झाल्याचं पोलिसांनी जाहीर केलं. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं होतं. मात्र, मुंबई पोलिसांना हा आरोपी 40 वर्षात सापडला नव्हता.
मे महिन्यात आरोपीला अटक : या आरोपीला 2024 च्या मे महिन्यात अटक करण्यात आली आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. या प्रकरणातील आरोपीचं वय आणि 40 वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेला गुन्हा या बाबीची दखल घेत न्यायालयानं प्राधान्यानं खटल्याची सुनावणी सुरू केली आणि निकाल दिला.
हेही वाचा