मुंबई Pradhanmantri Mudra Yojana : प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या नावाखाली लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दरम्यान, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 58 लाख रुपयांचे सोने, रोख रक्कम आणि 58 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
500-600 लोकांची फसवणूक : प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याची तक्रार एका व्यक्तीनं मुंबई पोलिसांकडे केली होती. तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असता, प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या नावाखाली फसवणुकीचं संपूर्ण रॅकेट नवी मुंबईतून चालवलं जात असल्याचं समोर आलं. हा सुगावा मिळताच मुंबई पोलिसांच्या पथकानं नवी मुंबईतील उलवे भागात छापा टाकला आणि तेथून 10 आरोपींना अटक केली. या छाप्यात 58 लाख रुपयांचं सोनं, रोख रक्कम, लॅपटॉप आणि अनेक मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट गेल्या 2 वर्षांपासून सुरू होते. तसंच आतापर्यंत आरोपींनी देशभरात सुमारे 500-600 लोकांची फसवणूक केल्याचंही पोलिसांनी सांगितले.
अशी करायचे फसवणूक : अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत त्यांच्या कारवायांचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. मोडस ऑपरेंडीचा एक भाग म्हणून ही टोळी सोशल मीडियावर प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळवण्याच्या जाहिराती देत असे. या जाहिरातीत एक संपर्क क्रमांकही होता. या क्रमांकावर कोणीही संपर्क साधला असता, या टोळीतील लोक कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत असत. तसंच कर्ज मिळण्याच्या प्रक्रियेत वेगवेगळे शुल्क आकारले जाईल, असं सांगून ही टोळी त्यांच्या खात्यात हजारो रुपये जमा करून घेत असे. ग्राहकाचे पैसे त्याच्या खात्यात जमा होताच ही टोळी त्याच्याशी संपर्क तोडायची.
देशभरात 45 गुन्हे दाखल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने ग्राहकांच्या नावाने उघडलेली 17 बँक खाती लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरली आहेत. एवढंच नाही तर अटक करण्यात आलेल्या आरोपींवर देशभरात 45 गुन्हे दाखल आहेत, मात्र त्यांना आत्तापर्यंत एकाही प्रकरणात अटक झालेली नाही. तसंच या टोळीचे जाळे देशभर पसरले असून त्यात आणखी आरोपी आहेत, त्यांचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा -