मुंबई : रविवारी रात्री एका मद्यधुंद प्रवाशानं चालकाशी वाद करत बेस्ट बसचे स्टेअरिंग पकडले. यावेळी अनियंत्रित झालेल्या बसचा अपघात होऊन नऊ पादचारी जखमी झाले. त्यापैकी तीन पादचारी गंभीर आहेत. हा अपघात रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमार घडला.
मद्यधुंद प्रवाशानं वाद घातल्यानं बसच्या चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. यावेळी लालबाग परिसरात बसनं पादचारी, कार आणि दुचाकींना धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. काळाचौकी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, रूट 66 वरील इलेक्ट्रिक बस (दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअरवरून) सायनमधील राणी लक्ष्मीबाई चाळकडे जात असताना हा अपघात घडला.
नेमका कसा अपघात झाला?- दारूच्या नशेत असलेल्या प्रवाशानं बेस्टच्या चालकाशी हुज्जत घातली. लालबाग येथील गणेश टॉकीजजवळ बस आली असता अचानक त्यानं स्टेअरिंग पकडले. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. यावेळी भरधाव वेगातील बसनं दोन दुचाकी आणि एका कारला धडक दिली. यावेळी काही पादचाऱ्यांना बसनं धडक दिली. अपघातात नऊ जण जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली. अपघातामधील सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अपघाताला जबाबदार असलेल्या मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.
दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी- खासदार सुप्रिया सुळे यांनी बेस्टच्या अपघातात दोषींवर कारवाईची मागणी केली. त्यांनी एक्स मीडियात पोस्टमध्ये म्हटले, " मुंबईत बेस्ट प्रशासनाच्या ६६ क्रमांकाच्या बसमध्ये लालबाग परिसरात एका मद्यधुंद प्रवाशानं चालकाशी हुज्जत घालून बसच्या स्टेअरिंगला हात घातल्यानं अपघात होऊन काही पादचारी तथा वाहनचालक जखमी झाल्याची घटना घडली. हा अतिशय दुर्दैवी आणि दुःखद प्रकार आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर तातडीने कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. ते सुखरूप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना."
हेही वाचा-