छत्रपती संभाजीनगर Mukhyamantri Ladki Bahin Yojana : गाँव बसा नहीं और लुटेरे आ गए, अशी अवस्था महाराष्ट्र सरकारच्या चर्चित योजनेबाबत घडला आहे. राज्य सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' घोषित करून काही दिवस उलटत नाहीत तोच या योजनेशी संबंधित पहिला गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालाय. या योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या माजी महिला जिल्हाध्यक्षाने आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार करमाड येथे उघडकीस आला. वंदना म्हस्के (Vandana Mhaske) असे या महिलेचं नाव असून ती प्रहार संघटनेत कार्यरत होती. ही घटना समोर येताच पक्षाने तिची हकालपट्टी केली आहे. सहा महिलांनी तहसीलदार यांच्याकडं तक्रार केल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यात आली. सदरील महिला दोषी आढळून आल्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती तलाठी विशाल मगरे यांनी दिली.
पैश्यांची केली मागणी : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू केल्याची घोषणा केली. योजनेचा फायदा मिळावा, याकरिता गरजू महिलांनी वेगवेगळ्या सेतू सुविधा केंद्रांवर नोंदणी करण्यासाठी गर्दी केली. लाभार्थी होण्यासाठी असलेली प्रक्रिया माहीत नसल्यानं अनेक महिला संभ्रमावस्थेत होत्या. या परिस्थितीचा फायदा काही लोकांनी घेत त्यांची फसवणूक करायला सुरुवात केली. त्यातच प्रहार संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष वंदना म्हस्के यांनी देखील करमाड गावात महिलांना लाभ मिळून देण्यासाठी पैश्यांची मागणी केली. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'स इतर योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी काही महिलांकडून ३ ते ५ हजार रुपये घेतले. मात्र नोंदणीबाबत महिलांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं संशय बळावला आणि महिलांनी थेट तक्रार नोंदवली.
महिलांना दिली धमकी : संजय गांधी, श्रावण बाळ आणि लाडकी बहीण अशा योजना मंजूर करण्यासाठी वंदना म्हस्के या गोरगरीब महिलांकडून पैसे उकळत होत्या. पैसे देऊन देखील अनुदान खात्यावर जमा होईल याची शाश्वती नसल्यानं महिलांनी म्हस्के यांना जाब विचारला. त्यावेळी तिने त्यांना धमक्या देत होत्या, म्हणून महिलांनी तहसीलदारांकडे धाव घेतली. तहसीलदारांनी पाच महिलांचे जबाब घेऊन या प्रकरणाची शहानिशा करून तलाठी यांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. या महिलांनी आपल्या जबाबमध्ये वंदना म्हस्के ही 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी 4 हजार रुपये, संजय गांधी या योजनेसाठी 5 हजार रुपये, श्रावण बाळ योजनेचे पगार चालू करण्यासाठी 3 हजार रुपये अशा पद्धतीने लूट करत होती.
पोलिसात दिली तक्रार : प्रकरणाची चौकशी केल्यावर तलाठी विशाल मगरे यांनी तहसीलदारांच्या सूचनेनुसार करमाड पोलीस ठाण्यात वंदना म्हस्के या महिलेविरोधात फिर्याद दिल्यावर राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने' बाबत फसवणूक केल्याचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. या अगोदर देखील असे प्रकार झालेत का? सोबतच या महिलेने अजून किती निराधार, गरीब महिलांना लुबाडलं? याबाबत शहानिशा सुरू असल्याची माहिती करमाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी दिली.
वंदना म्हस्केंची हकालपट्टी : वंदना म्हस्के ही महिला प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असल्याने लेटरहेड वापरून योजना मंजूर करण्यासाठी उपोषणाचा इशारा देत होती. याच लेटरहेडचा वापर करून ती शासनाच्या विविध कार्यालयातून माहिती मागवत होती. अध्यक्ष नसताना ती लोकांना अध्यक्ष असल्याचं भासवत होती. यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष जे. के जाधव यांनी वंदना म्हस्के या महिलेची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या महिलेची महिला जिल्हाध्यक्ष या पदावरून मागच्या दीड वर्षाअगोदरच पायउतार केले होते. मात्र आता कार्यकर्ता म्हणून देखील वंदना म्हस्के या महिलेची हकालपट्टी केली आहे. यानंतर ही महिला प्रहार जनशक्ती पक्षाचा वापर करणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अशी ग्वाही जे के जाधव यांनी दिली.
हेही वाचा -
- 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजने'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'सोशल' सहारा - Mukhyamantri Ladki Bahin Yojana
- 'लाडकी बहीण' योजनेच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची आघाडी? भाजपा म्हणते... - Ladki Bahin Yojana
- 'लाडक्या बहिणी'साठी अजित पवारांची मोठी घोषणा; यंदाच्या रक्षाबंधनला भेटणार मोठी ओवाळणी - Mazi Ladki Bahin Yojana