पुणे : जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्यानं अशक्य गोष्ट देखील शक्य होत असते, हे आपण अनेक उदाहरणातून पाहिलय. असंच विचार करून एका अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमवलेल्या सूरज गायवाल या तरुणानं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 'मिस्टर इंडिया' हा किताब जिंकला. सूरजच्या या जिद्दीची कहाणी पाहूया...
सूरजच्या घरची परिस्थिती हलाखीची : आयुष्यात कितीही संकटं आली आणि जर तुमच्या मनात त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि प्रचंड इच्छा शक्ती असेल, तर काहीही शक्य होतं. पुण्यातील देहूरोड येथे राहणार्या सूरज गायवाल या तरुणानं हे सिद्ध करून दाखवलय. सूरज हा पुण्यातील देहूरोड येथे राहात असून सर्वसामान्य लोकांप्रमाणे एका गरीब कुटुंबात तो आपलं आयुष्य जगत होता. सूरजच्या घरची परिस्थिती हलाखीची असून 12 वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर सूरजनं विचार केला की, आपल्याला पुढे शिक्षण घ्यायचं असेल, तर शिक्षणासोबत काम देखील करणं गरजेचं आहे. त्यानं पार्ट टाईम काम शोधलं आणि तो केबल कनेक्शनच्या कामाला लागला. त्याचबरोबर पेपर टाकायचं देखील तो काम करू लागला.
उजवा हात आणि दोन्ही पाय कापावे लागले : 20 एप्रिल 2016 साली सकाळी पेपर टाकल्यावर सूरज केबलच्या कामाला गेला होता. वायफायची केबल टाकायचं काम सुरू होतं. टेरेसवर काम करत असताना नकळत सूरजचा उजवा हात डीपीच्या वायरला लागला आणि शॉक लागून सूरजचा हात आणि दोन्ही पाय जळाले. इन्फेक्शन झाल्यानं सूरजचा उजवा हात आणि दोन्ही पाय कापावे लागले.
आर्टिफिशियल पाय लावून बॉडी बिल्डिंगला सुरुवात : जळालेला हात आणि पायात इन्फेक्शन झाल्यानं सूरजचे हात आणि पाय काढावे लागतील, असं डॉक्टरांनी सूरजच्या घरच्यांना सांगितलं. तेव्हा सुरतच्या घरच्यांनी आणि त्याच्या भावांनी आमच्या मुलाला वाचवा, एवढंच डॉक्टरांना सांगितलं. सूरजचा उजवा हात आणि दोन्ही पाय काढावे लागले. आपल्यावर एवढं मोठं संकट आलेलं असतानाही सूरजनं त्याचा विचार न करता मनात जिद्द ठेवली आणि मनात विचार केला की, जर देवानं आपल्याला असं आयुष्य दिलंय, तर या आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवायला हवं. सूरज अशक्य असणाऱ्या बॉडी बिल्डिंगडे वळला. त्यानं आर्टिफिशियल पाय लावून बॉडी बिल्डिंग करायला सुरुवात केली.
अनेक अवॉर्ड मिळवले : हात पाय नसताना सूरजनं सुरू केलेल्या या नव्या संघर्षाबाबत बोलताना तो म्हणाला, "हात पाय काढल्यावर मी खूपच कमजोर झालो. डॉक्टरांनी देखील सल्ला दिला होता की, तुला शरीराची काळजी घ्यावी लागणार. बॉडी बिल्डिंगबाबत काहीच माहिती नसताना मी घरी असताना घरच्या घरी मेहनत घेत होतो. घरी जिमचं थोड फार साहित्य आणून मेहनत करू लागलो. खूपच अवघड प्रवास होता आणि हे करत असताना आज मी अनेक स्पर्धेत सहभाग घेत 'मिस्टर इंडिया' आणि 'मिस्टर युनिव्हर्स' असे अवॉर्ड देखील मिळवले. तसंच बिगेस्ट फेस्टिवल इंडिया या ठिकाणी जाऊन देखील मी अवार्ड्स मिळवलेत. पुढे जाऊन या क्षेत्रात मला खूप मोठं नाव करायचंय. तसंच दिव्यांग व्यक्ती म्हंटल की, सगळ्यांना वाटतं की मोटिवेशनसाठी असतात, परंतु मला हा लोकांचा समज काढून टाकायचा आहे, अशा भावना यावेळी सूरजनं व्यक्त केल्या.
हेही वाचा