छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar Crime News : तीन मुलींना सोडून गेलेल्या आई-वडिलांविरोधात अखेर शहरातील सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तब्बल दहा महिन्यांपूर्वी सातारा परिसरात आई-वडिलांनी आपल्या तीन मुलींना घरातच सोडून निघून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. शेजाऱ्यांनी या तिघींना तब्बल तीन महिने सांभाळलं. मात्र, आई-वडील कधी येणार हे स्पष्ट होत नसल्यानं अखेर बालकल्याण समितीनं दखल घेत त्यांना बालगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या मुलींचं वय 7, 9, 11 असं आहे. त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा तपास सुरू करण्यात आला. मात्र, पाच महिने उलटूनही आई-वडील समोर येण्यास तयार नसल्यानं अखेर या निर्दयी आई-वडिलांच्या विरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन महिने एकट्या राहिल्या मुली : सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिथं राहणारं एक दाम्पत्य आपल्या तीन मुलींना घरात सोडून निघून गेलं. याबाबत कोणाला कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. इतकंच काय तर मुलींना देखील याबाबत काहीच माहिती नव्हती. या मुलींचं वय सर्वात मोठी 11 वर्षे मधली 9 वर्षे तर सर्वात लहान 7 वर्षाची आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलींचे वडील बांधकामाचं मिस्त्री काम करतात, तर आई देखील बांधकामावर मोलमजुरीला जायची. यांना पाच अपत्यं आहेत. त्यात दोन मुलं आणि तीन मुली आहेत. दोन मुलं ही 15 आणि 13 वर्षांचे असून मुली लहान आहेत. सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनीत हे कुटुंब राहात होतं. मात्र वडिलांचं बाहेरील एका महिलेशी प्रेम प्रकरण जुळलं तर आईचंही एका पुरुषासोबत प्रेम प्रकरण सुरू झालं. यातूनच दोघांत खटके उडाले आणि एक दिवस वडिलांनी अचानक घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तर काही दिवसांनी आई देखील आपल्या प्रियकरासोबत घर सोडून निघून गेली. मात्र, त्यावेळी ती आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन गेली तर मुलींना मात्र घरातच सोडून गेली.
शेजाऱ्यांनी केला मुलींचा सांभाळ : हा सर्व घटनाक्रम एप्रिल 2023 या महिन्यात घडला, तीन मुली एकट्या घरात असल्याचं शेजाऱ्यांना कळलं. त्यांनी या चिमुकल्या मुलींकडं आई-वडिलांबाबत चौकशी केली. मात्र त्यांना काहीही माहिती नव्हतं. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या या तिन्ही मुलींना शेजाऱ्यांनी आपल्या लेकराप्रमाणं सांभाळलं. दोन वेळचं जेवण आणि त्यांची काळजी या लोकांनी घेतली. त्यादरम्यान त्यांच्या आई-वडिलांचा तपास घेण्याचं काम देखील त्यांनी केलं. मात्र तीन महिने उलटून गेले तरी काहीच मेळ लागत नसल्यानं अखेर बालकल्याण समितीला याबाबत त्यांनी माहिती दिली. त्यावर तातडीनं कारवाई सुरू करण्यात आली आणि या तिघींची रवानगी शहरातील एका बालगृहात करण्यात आली. तिथं त्यांचा सांभाळ केला जात असतानाच, बालसुधारगृहानं त्यांच्या आई-वडिलांबाबत अधिक माहिती काढली असता सदरील धक्कादायक प्रकार समोर आला. मुलींचे वडील कुठं आहेत हे अद्याप कळलं नसलं तरी, आईनं दुसरा विवाह केला असून दुसऱ्या पतीपासून तिला एक मुलगी देखील असल्याचं समोर आलं. मात्र, याबाबत मुलींची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नसल्याचं बालगृहाकडून सांगण्यात आलं.
बालगृहानं केला गुन्हा दाखल : या घटनेमुळं आई वडील इतके निष्काळजी कसे असू शकतात याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. वडील घर सोडून गेल्यावर आईनं लेकरांच्या नजरेसमोर राहून त्यांचा आधार होणं अपेक्षित होतं. मात्र आईनं देखील आपल्या मुलींना सोडून जाण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडं आपल्या दोन मोठ्या मुलांना घेऊन ती घरातून निघून गेली. मुली आहेत म्हणून त्यांना या निर्दयी आईनं सोडलं का? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. बालकल्याण समितीनं या तिन्ही मुलींना बालगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र आई-वडील तिकडं फिरकलेच नाहीत. त्यामुळं बालगृहाच्या व्यवस्थापकांनी या प्रकरणी सातारा पोलिसांत तक्रार दिला दिली आणि त्यानुसार बुधवार 28 फेब्रुवारी रोजी निष्काळजी आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करीत असल्याची माहिती देण्यात आली.
हेही वाचा :