मुंबई : विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून, मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पालिका आयुक्त काम पाहणार आहेत. पालिकेत असलेलं मनुष्यबळ, पालिकेतील यंत्रणा लक्षात घेता केंद्रीय निवडणूक आयोगानं मुंबईतील निवडणुका कंडक्ट करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर दिली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी पूर्ण झाली असून, या तयारीचा आढावा बुधवारी आयुक्तांनी पालिका मुख्यालयात घेतला आणि त्याची माहिती माध्यमांना दिली.
मतदारांना करता येणार नावनोंदणी : या संदर्भात माध्यमांशी बोलताना पालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी म्हणाले की, "आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, अद्यापही ज्या मतदारांनी आपली नोंदणी केली नसेल, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी. नावात किंवा अन्य बदल करणं, अथवा मतदार यादीत नाव समाविष्ट करायचं असल्यास 19 ऑक्टोबर ही शेवटची मुदत आहे. या मुदती आधी मुंबईतील मतदारांनी आपली नाव नोंदणी करून घ्यावी. यासाठी मुंबईतील विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांनी देखील सहकार्य करावं," असे आवाहन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केलं आहे. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा दोन्ही मिळून एकूण 36 मतदारसंघ आहेत. या 36 मतदारसंघ निहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.
मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी : लोकसभा निवडणूक काळात मतदारांनी मतदान केंद्रावर मोबाईल नेल्या प्रकरणी अनेक वाद झाले होते. यावेळी असे कोणतेही वाद होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली आहे. मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. एखाद्या मतदाराने अनावधानाने आपला मोबाईल आणला तर त्याला तो मोबाईल मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
मुंबईत 2,500 पोलीस अधिकारी, 21000 कर्मचारी तैनात : सोबतच काही दिवसांपूर्वीच झालेलं बाबा सिद्दिकी हत्याकांड पाहता, निवडणूक काळात पोलिसांनी नेमकी काय तयारी केली आहे? याबाबत माहिती विचारली असता, पोलीस प्रशासनानं सांगितलं की, "मुंबईतील संवेदनशील मतदार संघांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. लोकसभा निवडणुकीत मुंबईत कोणतेही संवेदनशील विभाग नव्हते. यावेळी देखील संवेदनशील विभाग नाहीत. मात्र, तरी देखील आम्ही त्या संदर्भातील मॅपिंग करत आहोत," अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या निवडणूक काळात मुंबईत 2,500 पोलीस अधिकारी आणि 21000 कर्मचारी तैनात राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, निवडणूक तयारी काळात बारा ते पंधरा हजार आणि निवडणुकीच्या दिवशी 42000 महापालिकेचं कर्मचारी कर्तव्यावर असतील," अशी माहिती पालिकेनं दिली आहे.
महानगरपालिका क्षेत्रात 36 विधानसभा मतदारसंघ : माध्यमांशी बोलताना आयुक्त म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 36 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी 10 विधानसभा मतदारसंघ हे मुंबई शहर जिल्ह्यात आणि 26 विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात आहेत. सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून एकंदर निवडणूक कामाचा आढावा घेतल्यानंतर मतदान केंद्रांचं विकेंद्रीकरण आणि सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. एका मतदान केंद्राच्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त केंद्र असल्यास ते जवळच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. यासोबत मतदान केंद्रांची माहिती असलेल्या ‘क्यूआर कोड’सह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेलं पत्र प्रत्येक मतदारांच्या घरी जावून देण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.
हेही वाचा :