मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. यानंतर आता काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून आक्रमक पवित्रा घेत मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष पदावरून आमदार झिशान सिद्दीकी यांना हटविण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस पक्षाअंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आलं आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेस पक्ष नेतृत्वावर आरोप केले आहे.
कॉंग्रेसकडून माझं ब्लॅकमेलिंग: काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले की, ''मुंबई युवक काँग्रेस पदावरून हटवणं ही दुर्दैवी गोष्ट आहे. काँग्रेसमधील मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे. मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक मोठ्या फरकानं मी निवडून आलो होतो. मात्र, अध्यक्षपद मिळवण्यासाठी मला दहा महिने वाट बघावी लागली. त्या दहा महिन्यांच्या कालावधीत मला ब्लॅकमेल करण्यात आलं.''
कार्यकर्त्यांना विचारून पुढील वाटचाल: "माझे वडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचं म्हटलं होतं. तरीदेखील मला मुंबई काँग्रेस युवा अध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. कर्नाटक युवक काँग्रेसच्या संदर्भातदेखील असंच घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेस पक्षात अल्पसंख्याकांना स्थान नसल्याचाही त्यांनी दावा केला. काँग्रेस पक्ष मुस्लिम समुदायाबाबत सकारात्मक बोलत असतो. मात्र, तशा प्रकारे कृतीत वागत नसल्याचंही झिशान सिद्दीकी म्हणाले. तसंच तुमच्या टीममध्ये मुस्लिम समाजाला घेऊ नये, असं सांगण्यात आलं होतं. मुंबई काँग्रेसची यादी काढून बघा. त्यामध्ये किती मुस्लिम चेहरे आहेत, असा सवालाही सिद्दिकी यांनी उपस्थित केलाय. ''जर काँग्रेस पक्षाला अल्पसंख्याकांची किंमत नसेल तर आम्हालादेखील दुसरा पर्याय शोधणं गरजेचं आहे. त्यामुळे येत्या काळात मी काँग्रेससोबत राहीलच हे म्हणणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेईल'', असा इशारा आमदार सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला दिला आहे.
झिशान सिद्दीकींचा गांधी घराण्यावर निशाना: " मला कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते फोन करून सांगतात, तुझ्या वडिलांनी एनसीपीत प्रवेश केला तरी घाबरू नको. आम्ही तुझे गॉडफादर आहोत. कोणतीही पूर्व कल्पना न देता वॉट्सअपवर एक पत्र व्हायरल होते. मला हटवले आणि दुसऱ्या कोणाची नियुक्ती केली जाते. परंतु, मला अजून पदावरून काढल्याचं अधिकृत पत्र आलं नाही. आपण मुस्लिम आहोत म्हणून टार्गेट केलं जातंय का? राहुल गांधी यांच्या परिवारातील भाजपामध्ये आहेत म्हणून राहुल गांधी यांनादेखील पदावरून हटवलं पाहिजे. संजय गांधी यांचा परिवार भाजपात असल्यामुळे राहुल गांधींना काँग्रेसमध्ये ठेवायला नको का?'' असा थेट निशाणा झिशान सिद्दीकी यांनी गांधी घराण्यावर साधला आहे."
हेही वाचा: