छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क नाही; मात्र ते आले तर त्यांचं स्वागत असेल असं मत शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं. उबाठा गटाचे अनेक कार्यकर्ते आणि नेते, आमदार शिंदेंकडे येण्यास उत्सुक आहेत. मिलिंद नार्वेकरसुद्धा मातोश्रीशी संबंधित आहेत. ते येत असतील तर स्वागत आहे; मात्र आमचा त्यांच्याशी कोणताही संपर्क नाही, असं त्यांनी सांगत नार्वेकर यांना तिकीट देण्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं. तर शरद पवार यांच्या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळातील संदर्भ लिहिलेला असल्याने त्यांच्याबद्दल करण्यात येत असलेली टीका बरोबरच आहे, असं त्यांनी सांगितलं.
शरद पवार यांच्यावर विश्वास नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह आणि भाजपा सोबत झालेल्या बैठक बाबत माहिती सांगितली. यांच्या बैठका अनेक वेळा झाल्या. गुप्त बैठका होत्या, असं म्हणालो तरी प्रत्येक ठिकाणी CCTV निघू शकतात. शरद पवार यांच्या विषयीची माहिती येईल. शरद पवार यांच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. त्यांनी दिलेला शब्द अजित पवार यांनी पाळला. बावनकुळे यांनी पवार यांच्यावर टीका केली. त्यावर बोलताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे भले केले नाही. आज शेतकरी यांना मानणारा वर्ग दूर झाला आहे. शेतकऱ्याच्या मनात राग आहे, असं देखील शिरसाट यांनी सांगितलं.
बावनकुळे यांची टीका वैयक्तिक : भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची राजकारणातील नालायक माणूस अशी तुलना केली. त्यावर बोलताना त्यांची वैयक्तिक टीका आहे; मात्र असं असलं तरी उबाठाचे नेते उद्धव ठाकरे बोलले ते संयुक्तिक नव्हतं. मुलाला मुख्यमंत्री करायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे क्लास घ्यावे लागत असतील तर हे राजकारण कुटुंबापर्यंत मर्यादित असं म्हणावं लागेल. त्यांनी लोकांचा विश्वास गमावला आहे. याचा अर्थ नैतिकता गमावली आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.
२५ तारखेला मुख्यमंत्री शहरात : शिवसेना शिंदे गटाची लोकसभा उमेदवारी संदीपान भुमरे यांना देण्यात आली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज २५ एप्रिल रोजी भरण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः येणार असून गुलमंडी येथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला जाईल, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
हेही वाचा:
- पंतप्रधान पदावरुन संजय राऊत नाना पटोलेंमध्ये जुंपली; राऊत म्हणाले 'उद्धव ठाकरे होऊ शकतात पंतप्रधान पदाचे उमेदवार' - Sanjay Raut Slams Nana Patole
- ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग; परिसरात धुराचे लोट - Mumbai BJP Office Fire
- ठाकरे गटाचं प्रचार गीत वादात; उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच झापलं, मोदी-शाहांवरही हल्लाबोल - Uddhav Thackeray on ECI