बुलडाणा MLA Sanjay Gaikwad : शिवसेनेचे (शिंदे गट) बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यातच त्यांच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. याआधी वाघाचा दात गळ्यात घातल्या प्रकरणी वनविभागात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतजमीन बळकावल्यात प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानं बोराखेडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. आता त्यातच 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत दोन युवकांना पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण होत असताना त्या ठिकाणी आमदार संजय गायकवाड आले आणि त्यांनी पोलिसांच्या दांड्यानंच या दोन्ही युवकांना तुफान मारहाण केलीय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळं आता यात पोलीस काय कारवाई करणार याकडं लक्ष लागलंय.
शेतजमीन बळकावली प्रकरणी गुन्हा दाखल : वाघाचे दात प्रकरणात अडकल्यानंतर बुलडाणाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. आमदार गायकवाड यांनी आपण देत असलेल्या दरात शेतजमीन आपल्या नावावर करुन द्यावी लागेल, असा तगादा लावल्याचा आरोप या महिलेनं केला. महिलेच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करत फार्म हाऊस देखील बांधल्याचा त्यांच्यावर आरोप केला होता. आमदार गायकवाड यांनी त्या महिलेच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलं आणि त्यांच्या शेतजमिनीवरची कुंपणं त्यांनी काढून फेकली. तिथं त्यांनी अवैध फार्म हाऊस देखील बांधलं. त्यांच्या शेतजमिनीत उत्खनन करत त्यातून मुरुम काढला. यावर आक्षेप घेतला तर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याविषयी महिलेनं पोलिसांत तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कारवाई न केल्यानं न्यायालयात धाव घेतली. त्यामुळं शेतजमीन हडपून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली न्यायालयानं आमदार गायकवाडांसह त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांचेवरही गुन्हा दखल करण्याचे आदेश दिले होते. त्या नुसार बोराखेडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायम चर्चेत : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. शिवजंयतीच्या दिवशी संजय गायकवाड यांनी स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखातीत "आपण 1997 मध्ये वाघाची शिकार केली होती. त्याच्या दात गळ्यात बांधलाय. बिबट्या वगैरे तर आपण असंच पळवतो," असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं होतं. त्यामुळं ते पुन्हा वादात सापडले. एकंदरीत काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना विरोधकांना सडेतोड उत्तर देणारे संजय गायकवाड अडचणी सापडल्यानं विरोधकांच्या हातात चांगलाच मुद्दा सापडलाय.
हेही वाचा :