शिर्डी (अहमदनगर) Miss use Adhar for Sai Darshan : साई संस्थान सुरक्षा रक्षक किसन दगडू भारती यांच्या सतर्कतेमुळं महिलेचा गैरप्रकार समोर आला. याबाबत साईबाबा संस्थानच्यावतीनं सुरक्षा रक्षक किसन दगडू भारती यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या आधारे निमगाव कोऱ्हाळे येथील सोनाली पवन पोटे नामक महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाविकांच्या फसवणुकीचा हा अनोखा फंडा पाहता शिर्डी आणि परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
अशाप्रकारे केली फसवणूक: सोनाली पोटे नामक महिला आपलं आधारकार्ड घेऊन साई मंदिराच्या गावकरी गेटने दर्शनासाठी आली असता सुरक्षा रक्षकानं तिचं आधारकार्ड पाहून तिला प्रवेश दिला; मात्र तिच्यानंतर मागोमाग 5 भाविक गावकरी गेटनं प्रवेश करू लागले. त्यांचे आधारकार्ड तपासले असता सुरक्षा रक्षकाला संशय आला आणि या व्यक्तींच्या आधारकार्डमध्ये तफावत आढळून आली. त्यांना शिर्डीतील गावकऱ्यांचे आधारकार्ड कोणी दिले याबाबत विचारलं असता त्यांनी सोनाली पोटे यांनी दिल्याचं सांगितलं. यानंतर संस्थान महिला सुरक्षा रक्षकांनी सोनाली पोटे हिला ताब्यात घेत विचारपूस केली. यावेळी तिनं सांगितलं की, गर्दी असल्यानं ह्या भाविकांना पास न काढता थेट गावकरी गेटने सोडत पासचे पैसे त्या भाविकांकडून घेतल्याचं कबूल केलं.
भाविकांच्या फसवणुकीचे प्रकार सुरूच: संस्थान सुरक्षा रक्षक किसन दगडू भारती यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद देत याबाबत गुन्हा दाखल केलाय. या घटनेमुळे पुन्हा एकदा भाविकांच्या फसवणुकीचे प्रकार सुरूच असल्याचं दिसून आलं. आजूबाजूच्या लोकांचे आधारकार्ड गोळा करत भाविकांना गावकरी गेटने दर्शन घडवून आणणाऱ्या महिलेच्या चलाखीबाबत मोठी चर्चा परिसरात रंगली आहे.
फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश: बनावट आधारकार्ड गोळा करून साई दर्शन घडवून आणणाऱ्या चलाख व्यक्तींच्या विरोधात आता साईबाबा संस्थानच्या वतीनं मोहीम सुरू करण्यात आलीय. शिर्डी परिसरातील परराज्यातील व्यावसायिकांनी बनावट आधारकार्ड बनवून गावकरी गेटचा वापर करून संस्थानची फसवणूक केली. त्यांच्या विरोधात देखील कठोर पाऊले उचलत आधारकार्ड तपासणी कठोरपणे करण्याचा आदेश सुरक्षा रक्षकांना देण्यात आलाय. साईबाबा संस्थानच्या मंदिर सुरक्षा प्रमुख अण्णासाहेब परदेशी यांनी ही माहिती दिलीय. यापुढे बनावट आधारकार्ड किंवा गोळा केलेले आधारकार्ड दिसून आल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं यावेळी परदेशी यांनी सांगितलं.
हेही वाचा: