मुंबई - विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. एकीकडे महाविकास आघाडीतील जागावाटप 90 टक्के झाले असताना दुसरीकडे महायुतीत जागा वाटपावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. अशातच मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघाकडे महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून पाहिलं जातंय. दरम्यान, 2019 ला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मोठ्या मताधिक्क्यांनी येथून निवडून आले होते. यावेळी त्यांना मनसेचे संदीप देशपांडे आणि महायुतीचे मिलिंद देवरा यांचं आव्हान असणार आहे.
वरळीत तिहेरी लढत : वरळी मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवाराची चाचपणी सुरू होती. यात मिलिंद देवरा यांचं नाव आता समोर आलंय. त्याबाबतची पोस्टही त्यांनी 'एक्स'वर शेयर केली. 'आता वरळी' अशा प्रकारची पोस्ट मिलिंद देवरा यांनी केली. त्यामुळं त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. याबाबत मात्र अधिकृत घोषणा अजून झाली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे वरळीत महायुतीचा उमेदवार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना आता इथे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले आणि सध्या राज्यसभेवर खासदार असलेले मिलिंद देवरा यांचं नाव निश्चित झालं आहे.
Chief Minister @mieknathshinde ji believes that justice for #Worli & Worlikars is long overdue.
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) October 25, 2024
Together, we're paving the way forward & will share our vision soon.
It’s Worli NOW!
देवरा नक्कीच जिंकून येतील - आशिष शेलार : वरळी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वरळीत मिलिंद देवरा यांचं नाव चर्चेत होतं. यावर भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले की, "मिलिंद देवरा वरळीतून नक्की जिंकून येतील. कारण त्यांचे काम, त्यांची प्रतिमा यामुळे ते वरळीतून जिंकून येऊ शकतात, असा मला विश्वास आहे. कारण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून याआधी ते दोन वेळा खासदार राहिलेले आहेत."
जय शाहांना उभं करावं : "वरळीत एकनाथ शिंदे यांनी स्वतः उभे राहावं. वरळीत काय किंवा अन्य ठिकाणी पण जर त्यांना उमेदवार मिळत नसतील तर त्यांनी बाहेरून उमेदवार आयात करावा आणि वरळीतून एकनाथ शिंदेंनी जय शाहांना निवडणुकीसाठी उभं करावं", असा खोचक टोला संजय राऊत यांनी शिंदेंना लगावलाय.
तुल्यबळ तिरंगी लढत होणार : एकीकडे महाविकास आघाडीने आदित्य ठाकरे यांच्या रूपाने उमेदवार दिलाय. तर मनसेनेही संदीप देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. वरळी मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुती पेटून उठली आहे. कोणत्याही परिस्थितीत आदित्य ठाकरे यांचा पराभव करणे हेच महायुतीचे ध्येय असल्याचं एकंदरीत दिसतेय. त्यामुळे महायुतीची पूर्ण ताकद वरळीत लावली जाण्याची शक्यता आहे आणि महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी 100 टक्के नेते मैदानात उतरतील, यात शंका नाही. मात्र दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही वरळीत आपणच विजयी होणार असल्याचा निर्धार बोलून दाखवलाय. आदित्य ठाकरे यांचा पराभव करणे हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. त्यामुळं मनसेही आपली संपूर्ण ताकद पणाला लावणार यात शंका नाही.
वरळीत कोणाला फायदा? : महायुती आणि मनसेनं उमेदवार दिल्यामुळे आदित्य ठाकरेंना मिळणाऱ्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होणार असल्याचं बोललं जातंय. परिणामी त्याचा फायदा आदित्य ठाकरेंना होईल, असेही राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे वरळीत भाजपाच्या शायना एनसी आणि शिंदे गटाचे नेते तथा अभिनेते सुशांत शेलारही इच्छुक असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय.
वरळीत पक्षीय बलाबल कसे? : वरळी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी वरळीचा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. इथे पक्षीय बलाबल पाहिले तर शिवसेना (ठाकरे गटाचे) आदित्य ठाकरेंसह तीन आमदार आहेत. सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे विधान परिषदेचे आमदार आहेत. तर स्वतः आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गटाची) येथे ताकद मोठी आहे किंवा शिवसेना (ठाकरे गटाचा) वरळी हा बालेकिल्ला समजला जातो. एवढी ताकद असतानादेखील लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत हे थोड्या फार मतांनी विजयी झाले होते. खरं तर आताची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. दुसरीकडे जर मिलिंद देवरा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर इथे 2004 आणि 2009 असे दोन वेळा मिलिंद देवरा खासदार म्हणून निवडून आले होते.
देवरांसाठी लढाई कठीण? : 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता. आता विधानसभेत आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्यात "काँटे की टक्कर" होण्याची शक्यता आहे. कारण महायुतीचे तिन्ही पक्ष येथे जोर लावणार आहेत. यात बऱ्यापैकी देवरांना मतदान होईल, असं बोललं जातंय. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागील काही दिवसांपासून वरळीत बरीच समाजोपयोगी कामं केलीत, कार्यक्रम, सभा आणि विकासकामं केलीत. त्यामुळे वरळीत मनसेचाही बऱ्यापैकी प्रभाव दिसून येतोय.
आकडेवारी काय सांगते? : 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आदित्य उद्धव ठाकरे हे मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांना 89,248 एवढी मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ॲड. डॉ. सुरेश माने यांना 21,821 मत मिळाली होती. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे गौतम अण्णा गायकवाड यांना 6,572 एवढी मतं मिळाली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत कोण विजयी होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -