पिंपरी चिंचवड Vatpurnima 2024 : आधुनिक सावित्री तिच्या सत्यवानाला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना पाहायला मिळते. पण हीच सावित्री पुढची सात जन्म मला मिळावी, तिला दीर्घायुष्य मिळावं म्हणून कोणी पुरुष वडाची पूजा करताना दिसत नाहीत. पण पिंपरी चिंचवडमध्ये काही सत्यवानांनी सावित्री साठी वडाची पूजा केलीय.
काय आहे उपक्रम : पिंपरी चिंचवड शहरातील मानवी हक्क संरक्षण जागर समिती गेल्या 9 वर्षांपासून पिंपळे गुरव परिसरात पुरुष आणि महिला कुठलाही भेदभाव न करता स्त्री पुरुष समानता दाखवत आणि पर्यावरणातील ऑक्सीजनचा स्रोत असलेल्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारत ही आगळी वेगळी वट पौर्णिमा साजरी करत आहेत. 150 वर्षे जगणाऱ्या या वटवृक्षा प्रमाणे आपल्या पत्नीची साथ आपल्याला मिळावी अशी त्यांची भावना आहे. त्याचबरोबर स्थानिक ठिकाणी महिलांसह पुरुषांनी सुद्धा वटवृक्षाला फेऱ्या मारुन सामाजिक बांधिलकी जपून एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवल्याचं दिसून आलं. या उपक्रमामुळं मानवी हक्क संरक्षण जागर समितीचा शहरात सर्वच ठिकाणी कौतुक होत आहे.
काय आहे उपक्रमाची संकल्पना : याबाबत बोलताना या समितीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले, "पत्नी व पती यांना कायद्यानं समान अधिकार दिले आहेत. पुरुषप्रधान देशात महिला पण आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन खुरपणी पासुन ते नासापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. पंतप्रधान पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महीला पोहोचल्या आहेत. तरीही त्या पतीला दिर्घ आयुष्य मिळावं म्हणून 150 वर्षे आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाला सात फेरे प्रदिक्षणा घालतात, मनोभावे पुजा करतात. मग पुरुषांनीही जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी आणि पत्नीला दिर्घ आयुष्य मिळावं व सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाची सात फेरे मारुन वटपौर्णिमा साजरी केली तर वावगं ठरु नये. आम्हाला सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून आम्ही वटवृक्षाच्या फेऱ्या मारुन सुत घालून, सनई, वाद्य वाजवून मनोभावे पूजा केल्याचं समाधान मिळालं."
हेही वाचा :