पुणे Maratha Reservation Row : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईकडं रवाना झाले आहेत. बुधवारी लोणावळा शहराजवळील वाकसई फाटा इथं जाहीर सभेचं नियोजन असून मुक्काम देखील याच ठिकाणी होणार आहे. यासाठी सुमारे 100 एकर पेक्षा अधिक जागा साफसफाई करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून सभेची जोरदार तयारी या ठिकाणी सुरु आहे.
वाघोलीतून निघणार आंदोलक : वाघोली येथील महालक्ष्मी लॉन्स येथून या आंदोलनाला आज सुरुवात होणार आहे. इथून हा आंदोलक खराडी, जहांगीर हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ चौक ते औंध डांगे चौक मार्ग लोणावळा असं जाणार आहेत. मोर्चा सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांच्या समोर सरकारनं तीनकलमी प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी रांजणगाव इथं मांडला होता. हा प्रस्ताव मनोज जरांगे यांनी फेटाळून लावला आहे.
मराठा आरक्षणाला मिळणार दिशा : राज्यात 54 लाख कुणबी प्रमाणपत्र सापडले आहेत. ही सकारात्मक बाब असून राज्यभर मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. क्युरेटिव्ह पेटीशनवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यातून आरक्षणाला दिशा मिळणार आहे, असे तीन कलमी प्रस्ताव हे मनोज जरांगे यांच्यासमोर मांडण्यात आले होते. पण जरांगे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी जो मोर्चा मुंबईच्या दिशेने काढला आहे, त्या मोर्चामध्ये लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले आहेत. आपल्या लहान मुलांसोबत मिळेल, त्या ठिकाणी थंडीत मुक्काम करून हे आंदोलक जरांगे पाटील यांची साथ देत आहे.
मावळचे आमदार सुनिल शेळकेंनी दिली भेट : सकल मराठा समाजाचे हजारो तरुण या ठिकाणी मदत कार्य करीत असलेले चित्र पाहायला मिळत आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी या सभेच्या ठिकाणाला भेट देत जागेची पाहणी केली. तसेच सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती घेतली.
मराठा आंदोलकांचा लोणावळ्यात मुक्काम : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले असून आज लोणावळा या ठिकाणी मुक्कामास थांबणार आहेत. याठिकाणी एक सभा देखील घेण्यात येणार असून त्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले आहे. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आदी पोलीस अधिकाऱ्यांनी सभास्थळी पाहणी केली. सकल मराठा समाजाशी सविस्तर चर्चा करुन स्टेज आणि जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार सुनिल शेळके म्हणाले, "मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या भव्य स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज झाला आहे. सर्व समाजातील बांधवांनी शक्य होईल, त्या पद्धतीनं सहकार्य करावं. मावळ तालुक्यानं नेहमीच जातीय सलोखा आणि एकोपा जपला आहे. पदयात्रेच्या निमित्तानं तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगानं आपल्या तालुक्याकडून कुठल्या गोष्टीची कमतरता भासू नये, यासाठी प्रत्येकानं सहकार्य करावे," असं आवाहन देखील आमदार शेळके यांनी केलं आहे.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंतरवाली सराठी इथून निघालेला मराठा मोर्चा आज मावळात येणार असून त्यासाठी मावळ तहसील तसेच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ही लोणावळा विभागातील मराठा समाजाशी चर्चा करून सभेची पूर्ण माहिती घेतली. या सभेदरम्यान कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी आणि सूचना आमदारांनी प्रशासनाला केल्यात. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जागोजागी फलक लावण्यात आले आहेत.
हेही वाचा :
मराठा आरक्षण; मराठा आंदोलनाची ठरणार दिशा, सर्वोच्च न्यायालयात आज 'या' पिटीशनवर सुनावणी
मराठा आरक्षण; मराठा आंदोलनाची ठरणार दिशा, सर्वोच्च न्यायालयात आज 'या' पिटीशनवर सुनावणी