पुणे Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईला निघाले असून आज त्यांचा पुण्यात मुक्काम आहे. पुण्यातील वाघोली इथं त्यांचा मेळावा होता. याचवेळी या आंदोलनात एक पाच वर्षाचा चिमुकला सुद्धा सहभागी झाला आहे. या चिमुकल्यानं मराठा आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नसल्याचा निर्धार केला आहे. मराठवाड्यातल्या हिंगोली, नांदेड, बीड, परभणी या दुष्काळी भागातले नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले आहेत. या नागरिकांनी मोठ्या आक्रमक प्रतिक्रिया यावेळी दिलेल्या आहेत. दरम्यान
पुणे जिल्ह्यातील दौंडमधून आला पाच वर्षाचा चिमुकला : पुणे जिल्ह्यातील दौंडमधून हा पाच वर्षाचा चिमुकला आपल्या वडिलांसोबत पायी आंदोलनात सहभागी झाला आहे. त्याच्या वडिलांनी त्याच्या भविष्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी झालो आहोत, असं म्हटलं आहे. "बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, परळी, गेवराई या भागातून सहा महिने पुरेल, एवढं सगळं अन्न पाणी घेऊन आम्ही सहभागी झालो आहोत. आता आरक्षणाशिवाय माघार नाही" अशी प्रतिक्रिया या सहभागी झालेल्या आंदोलकांनी दिलेली आहे.
वाघोलीत 75 एकर जमिनीवर मुक्काम : पुण्यातील वाघोली परिसरामध्ये जवळपास 75 एकर जागेवर या आंदोलकांच्या राहण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. यात अबालवृद्ध, महिला त्याचबरोबर युवक सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. पुणेकरांकडून मात्र मोठ्या प्रमाणात आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं आहे. कुणालाही काही कमी पडणार नसल्याचं चित्र सध्या जरांगे यांचा मुक्काम असलेल्या उबाळी नगरमध्ये दिसत आहे.
तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था : तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आणि सोबत जेवणाची व्यवस्था करून हजारो वाहनाचा ताफा जरांगे यांच्यासोबत आहे. त्यातला अर्धा ताफा आज पुण्यनगरीत दाखल झालेला आहे. "आजपासून शहराच्या जवळून प्रवास सुरू होत असून आम्हाला आरक्षण मिळेल आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही," अशी प्रतिक्रिया या सगळ्या आंदोलकांनी दिलेली आहे.
आरक्षणाची आता आरपारची लढाई : "ही आरक्षणाची लढाई आता आरपारची आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. मुंबईत सहा महिने लागो, तीन महिने लागो, सात महिने झाले तरी मनोज जरांगे हे योद्धा म्हणून लढत आहेत. सरकारला यांच्याशी काही देणंघेणं नाही. आमचेच राजकारणी आमचा गळा दाबत आहेत. त्यामुळं आता आरक्षणाची लढाई पूर्ण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही." अशी प्रतिक्रिया आंदोलकानं दिलेली आहे.
हेही वाचा :