जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक 2024 मधून माघार घेतली आहे. मनोज जरांगे यांनी आज सकाळी आंतरवली सराटी इथं माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून याबाबतची घोषणा केली. "कोण्या एका जातीच्या भरोश्यावर निवडणूक लढता येत नाही," असं यावेळी मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. "समाज बांधवांकडून उमेदवारांची यादीचं न आल्यानं आपण विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवार देणार नाही. मात्र आता फक्त पाडापाडी करायची की कोणाला निवडून द्यायचं," याचा निर्णय समाज बांधवांनी घ्यावा, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
एका जातीवर निवडणूक लढता येत नाही : आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना बोलवलं होतं. यावेळी मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये आपण काय करायचं याबाबतची माहिती दिली. आपण मित्रपक्षाला आणि समाज बांधवांना उमेदवारांची यादी देण्याची मागणी केली होती. मात्र उमेदवारांची यादीच न आल्यानं मनोज जरांगे यांनी आज सकाळी विधानसभा निवडणूक 2024 मधून माघार घेत असल्याची माहिती जाहीर केली. "एकाच जातीच्या जोरावर निवडणूक लढता येत नाही, त्यामुळे आपल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागं घ्यावा," असं स्पष्ट केलं.
मनोज जरांगेंनी काही मतदार संघाची केली होती चाचपणी : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आगामी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मनोज जरांगे यांच्या वतीनं काही जागांवर उमेदवार देणार असल्यानं त्या मतदार संघाची चाचपणीही करण्यात आली. मात्र आज सकाळी मनोज जरांगे यांनी आपण विधानसभा निवडणूक 2024 मधून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी "तुम्हाला ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, ज्यांना निवडून द्यायचं त्याला निवडून द्या," असं जाहीर केलं.
हेही वाचा :