सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मराठा आरक्षणाची दाहकता अजून पूर्णपणे थंड झालेली नाही. असं असतानाच सोलापूरमधील कासेगावमध्ये अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार सचिन कल्याणशेट्टी गुरुवारी (24 ऑक्टोबर) सायंकाळी प्रचाराला गेले होते. यावेळी मराठा बांधवानी कल्याणशेट्टी यांची सभा सुरू असताना 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा देत सभा बंद पाडली. तसंच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तुम्ही काय योगदान दिलं? असा सवालही यावेळी मराठा बांधवानी सचिन कल्याणशेट्टी यांना केला.
मराठा समाज आजही संतप्तच : दोन महिन्यापूर्वी देशभरात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीत मराठा बांधवानी सोलापूरमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा विरोध केला होता. अनेकदा सभास्थळी येऊन मराठा बांधवानी जोरदार घोषणाबाजी करत सभा होऊ दिल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. विधानसभा निवडणुकीत देखील मराठा बांधव उमेदवारासमोर शक्ती प्रदर्शन करत जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं बघायला मिळतय.
सोलापुरात नेमकं काय घडलं? : सचिन कल्याणशेट्टी हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात कल्याणशेट्टींना भाजपाकडून दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. गुरुवारी सायंकाळी कासेगावमध्ये ते ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आले होते. कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर आणि भाजपा समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करून राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोबोशाह वली कट्ट्यावर सभेचं आयोजन केलं होतं. मात्र, त्यांच्या समर्थकांनी त्यांचं स्वागत करण्यापूर्वी गावाच्या वेशीजवळ मारुती मंदिरासमोर जमलेल्या मराठा समाज बांधवांनी, 'एक मराठा, लाख मराठा', 'जय जिजाऊ, जय शिवराय', अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी सचिन कल्याणशेट्टी यांनी मराठा समाज बांधवांसमोर त्यांची मराठा आरक्षणासंबंधी भूमिका विशद केली. तसंच मराठा आरक्षणासंबंधी आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांच्यावर 2 गुन्हे असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मराठा बांधवांची जोरदार घोषणाबाजी : यावेळी मराठा समाज बांधवांनी सचिन कल्याणशेट्टींकडं आपण मराठा आरक्षण समर्थनासाठी फेसबुकवर शेअर केलेली एखादी पोस्ट दाखवा, म्हणून हट्ट केला होता. त्यानंतर घोषणाबाजी वाढतच गेल्या. कल्याणशेट्टी गर्दीतून वाट काढत समर्थकांसमवेत सभास्थळाकडं गेले. ते बोलण्यास उभे राहिले, त्यावेळी '... लढेंगे, हम सब जरांगे'च्या घोषणा सुरू झाल्या. त्यानंतर सभास्थळावरून कल्याणशेट्टी थेट वाहनात बसले आणि त्यांनी परतीचा प्रवास सुरू करणं पसंत केलं.
हेही वाचा -