मुंबई Manoj Jarange Patil : मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळावं, यासाठी सरकारवर काही अटी लादत आजचा मुक्काम वाशीतच राहणार असल्याचं मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. तर, दुसरीकडं मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर उद्या ठाणं मांडू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळं मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची गर्दी वाढत असून राज्यभरातून हजारो आंदोलक मुंबईतील दाखल झाले आहेत.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न : मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरणारे मराठा नेते मनोज जरांगे यांनी आता या प्रकरणी आरपारची भूमिका घेत आज वाशीत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. अनेक अटींसह सरकारनं सगेसोयरे संबंधित अध्यादेश आज रात्रीपर्यंत जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आझाद मैदानावर मोठा पोलीस बंदोबस्त : एकीकडं मनोज जरांगे पाटील यांचा ताफा नवी मुंबईत अडकवून पडला असताना मुंबईतील आझाद मैदानावर हजारो कार्यकर्ते जमले होते. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषण करणार होते. मात्र, पोलिसांनी आझाद मैदानात परवानगी नाकारल्यानं कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता त्यांनी आज सकाळी 11 वाजल्यापासून नवी मुंबईत उपोषण सुरू केलं. त्यामुळं आझाद मैदानावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांची गर्दी पाहता आज दुपारी मुंबईत वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळं वाहतूक पोलिसांना आझाद मैदान परिसरातील काही रस्त्यांवरील वाहतूक वळवावी लागली होती.
मुंबई सोडणार नाही : मुंबईतील आझाद मैदानावर उपस्थित हजारो मराठा आंदोलकांच्या वाशीतील सभेत मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मनोज जरांगे पाटील कोणत्याही परिस्थितीत आज आझाद मैदानात धडक देतील, असा विश्वास या आंदोलकांना होता. तशी जय्यत तयारीही तिथं करण्यात आली होती. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी सध्या नवी मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला असून ते उद्या मुंबईत धडकणार आहेत. त्याआधी सरकारला अध्यादेश काढण्यासाठी आज रात्रीची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर जमले असून त्यांनी सर्व खाद्यपदार्थही सोबत आणले आहेत. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील मुंबई सोडण्याचे आदेश देत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मुंबई सोडणार नाही, अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे.
उद्या मुंबई ठप्प होण्याची भीती : आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही आज तिथं हजारो कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. एवढंच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा कार्यकर्ते आले असून त्यांचा मुक्कामही आज रात्री मैदानावरच असणार आहे. सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य न केल्यास जरांगे पाटीलांचा ताफा उद्या मुंबईच्या दिशेनं निघणार आहे. त्यामुळं वाहतूक कोंडी होऊन मुंबई ठप्प होण्याची शक्यता आहे.
'हे' वाचलंत का :