छत्रपती संभाजीनगर Rajshri Umbre Calls Off Hunger Strike : मराठा आरक्षण लढ्याचा शेवट गोड होणार असल्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं. मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी राजश्री उंबरे या आंदोलक गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसल्या होत्या. सरकार तर्फे दीपक केसरकर आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी आलं. यावेळी "पुढील दोन आठवड्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या देखील अशाच असल्यानं त्यांना सोबत घेऊन पुढील चर्चा करू. त्यासाठी दोन आठवडे लागणार आहेत," असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. करण्यात आलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन मिळाल्यानं उपोषण स्थगित करत असल्याचं राजश्री उंबरे यांनी घोषित केलं.
14 दिवसांपासून सुरू होते उपोषण : मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करा, यासह इतर 21 मागण्यांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्षा राजश्री उंबरे यांनी उपोषण सुरू केलं होतं. निझामाच्या राजवटीत आरक्षणात असलेल्या समाजाला आज आंदोलन करावं लागत आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्या, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या अशा मागण्यांसाठी 14 दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेलं. त्यावेळी सर्व मागण्यांबाबत चर्चा झाली, त्यानुसार राजश्री उंबरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ रविवारी सायंकाळी शहरात दाखल झालं. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि अल्पसंख्यांक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागण्यांबाबत चर्चा केली.
आश्वासनानंतर उपोषण स्थगित : दीपक केसरकर यांनी सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर यावर मुख्यमंत्री स्वतः आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. "मनोज जरांगे यांच्यामुळे हैदराबाद संस्थानात आणि इतर ठिकाणी असलेल्या नोंदी मिळाल्या आहेत. त्यांच्यामुळे मोठं काम झालं असल्यानं त्यांना डावलून कुठलाही निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे दोन आठवड्यात याबाबत योग्य निर्णय घेऊ," असं आश्वासन केसरकर यांनी दिलं. हैदराबाद गॅझेट लागू करा, पोलीस भरतीत असलेली बंदी काढा, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कामावर रुजू करा, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. सरकार सकारात्मक असल्यानं आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा राजश्री उंबरे यांनी जाहीर केली. दोन आठवड्यात निर्णय झाला नाही, तर आंदोलन पुनः सुरू होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
हेही वाचा :