जालना Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यामुळं त्यांची आज (मंगळवारी) प्रकृती खालवलीय. मात्र, ग्रामस्थांच्या विनंतीनंतर त्यांनी उपचार घेतले. सरकारनं यावर काही मार्ग न काढल्यास 'मी' उपचार घेणार नाही, असं जरांगे पाटील यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर दुसरीकडं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून, त्यांनी उपोषण मागं घ्यावं, असं ते म्हणाले.
नवा अध्यादेश काढा : गेल्या चार दिवसांपासून बीड, जालना संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले. मात्र, सरकारकडून कोणत्याही प्रतिनिधीनं त्यांची भेट घेतलेली नाही. सगे-सोयऱ्यांचा उल्लेख करून नवा अध्यादेश काढावा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, या मागणीवर ते ठाम आहेत. त्यामुळं सरकारनं उपोषणाकडं लक्ष न दिल्यास मराठा समाज आक्रमक पवित्रा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्य सरकारला इशारा : पोलिसांची परवानगी नसतानाही जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. सगे-सोयऱ्यांचा अध्यादेश काढा, अन्यथा विधानसभा 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आगोदरच लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा महायुतीला फटका बसला आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्याआधी पुन्हा एकदा त्यांनी उपोषणाचं हत्यार उगारलंय. त्यामुळं महायुती सरकारसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
सरकारशी चर्चा करण्यास तयार : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहेत. हा प्रश्न निकाली निघेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्यांनी यापूर्वीही आमरण उपोषण केलं होतं. मुंबईपर्यंत मोर्चाही काढण्यात आला होता. यानंतर ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. यात त्यांची प्रकृती खालावत आहे. काल त्यांनी दोनदा डॉक्टरांकडून तपासणी करण्यास नकार दिला. 'मराठा आरक्षणासाठी लढण्याचा माझा निर्धार आहे. 'मी' मृत्यूला घाबरत नाही', असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
खासदार संजय जाधव यांचाही मनोज जरांगे यांना पाठिंबा : ओमराजे निंबाळकर यांच्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनीही मनोज जरांगे यांच्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. याबाबत त्यांनी एक पत्र ट्विट केलं आहे. 'मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांना 'मी' माझा जाहीर पाठिंबा घोषित करत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. एक मराठा मावळा, मराठा आरक्षणाची राजधानी म्हणून पुढं आलेल्या आंतरवाली सराटी ज्या ठिकाणी आहे, त्या मतदारसंघाचा खासदार म्हणून आरक्षणाच्या या आंदोलनाला मी तन-मन-धनानं माझा जाहीर पाठिंबा घोषित करत आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे.
हे वाचलंत का :