चंद्रपूर Leopard caged in Chandrapur: छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याचा वावर असल्याची घटना ताजी असतानाच आता चंद्रपूरमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला. शिवणी वनपरिक्षेत्रमधील नलेश्वर उपवन क्षेत्रातील मोहाडी इथं एका बिबट्यानं बारेकर यांचे घरात घुसून चांगलाच धुमाकूळ घातला. या बिबट्यानं गावातील ६ व्यक्तींना जखमी केलं. तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं.
बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी : सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी जवळील नलेश्वर गावात रात्री गावकऱ्यांना 3 बिबटे दिसले. त्यामुळे दिवसभर रेस्क्यू मोहिमेत उर्वरित बिबटे कुठं गेली, असा प्रश्न उपस्थित झाला. सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्र हे जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलं आहे. या वनपरिक्षेत्रातील मोहाडी इथं शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान एक बिबट्या (मादी) आणि सोबत 2 बछडे गावच्या दिशेनं येताना गावकऱ्यांना दिसले. त्यामुळे गावातील नागरिक भयभीत होऊन हातात काठ्या घेऊन सैरावरा पळत असताना बिबट्यानं गावातील सहा व्यक्तींना जखमी केलं. यामध्ये विजय देवगीरकर (वय ३५) , मनोहर दांडेकर ( वय अंदाजे ५०), जितेंद्र दांडेकर (वय ३०), सुभाष दांडेकर ( वय २५), ऋतिक वाघमारे (वय १८), पांडुरंग नन्नावरे (वय ३२) यांचा समावेश आहे. सर्व व्यक्तींना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र, जखम जास्त गंभीर असल्यानं सर्व जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं.
अखेर बिबट्या पिंजऱ्यात बंद: बिबट्यानं बारेकर यांचे घरात बस्तान मांडलं असल्यानं पिंजरे लावून त्याला पकडण्याचा बराच प्रयत्न वनविभागानं केला. मात्र, बिबट्यानं काहीच प्रतिसाद दिला नसल्यानं अखेर चंद्रपूर येथील चमूला पाचारण करण्यात आलं. अजय मराठे आणि डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी बिबट्याला रेस्क्यू केलं. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात कैद केलं. यावेळी गावात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून सिंदेवाही पोलिसांची मदत घ्यावी लागली. बिबट्याला जरी कैद केलं असलं तरी त्याचा बछडा गावात कुठंतरी दडून असल्याचं गावकरी सांगत आहेत. घटनेची माहिती वनविभागाला होताच वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांच्या नेतृत्वात सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून फटाके फोडून बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूरचे सहाय्यक वनसंरक्षक संकेत वाटोरे यांनी घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट दिली.
गावात लावले ट्रॅप कॅमेरे: "मोहाडी या गावाजवळ गुरुवारी सायंकाळपासून बिबट्या फिरत असल्याची माहिती मिळताच माझ्यासह सर्व वनकर्मचारी मोहाडी गावात आणि आजूबाजूला गस्त करुन रात्रभर फटाके फोडले. बिबट्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिबट्या गावातील एका घरात दडून बसला. तर त्याचे बछडे अजूनही बेपत्ता असल्यानं ट्रॅप कॅमेरे लावून बंदोबस्त सुरू केला आहे," अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनी दिली.
संतप्त गावकऱ्यांनी अडवलं वाहन : मादी बिबट्याला पकडल्यावर गावातील नागरिकांनी वनविभागाचं वाहन अडवलं. जोपर्यंत उर्वरित बिबट्याना पकडणार नाही, तो पर्यंत गावाच्या बाहेर एकही वाहन जाणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. वनविभागाच्या चमुला बाहेर काढण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं त्यानंतर वनविभागाची चमू त्या बिबट्याला सोबत घेत चंद्रपूर इथं उपचारासाठी रवाना झाली. सदर कारवाईत RFO साळकर, NGO SWAB चे यश कायरकर यांचे सहकार्य वनविभागाला मिळालं. संपूर्ण कारवाईत डॉ. जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक, रेड्डी उपसंचालक ( बफर ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हेही वाचा