अमरावती MLA Bacchu Kadu : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेला लढा धोरणात्मकरित्या जिंकला असून, सरकार नरमलं आहे, असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते अमरावतीत बोलत होते. नव्यानं सापडलेल्या 54 लाख नवीन नोंदींना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी जरांगे पाटील मुंबईला आंदोलनासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळं मी देखील जरांगेंना पाठिंबा दिल्याचं आमदार कडू यावेळी म्हणाले.
सगे, सोयऱ्यांचा प्रश्न मिटला : मराठा समाजातील सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी जरांगे पाटील यांनी दीर्घकाळ लढा दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही सगे सोयऱ्यांसंदर्भात सरकारकडून काही सुधारणा करून आणल्या आहेत. त्यामुळं सगे सोयऱ्यांचा प्रश्न मिटल्याचं आमदार बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं.
54 लाख नोंदींची वंशावळ काढणं कठीण : नव्यानं नोंदणी सापडलेल्या 54 लाख मराठा समाजालाही आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी सरकारकडं केली आहे. मागील दोन-तीन महिन्यांत राज्यात 54 लाख नवीन नोंदी सरकारला सापडल्या आहेत. आता या नव्या नोंदींनुसार संबंधितांची वंशावळ शोधणं, त्यांचं मूळ ठिकाण शोधणं अवघड काम असून प्रत्येकाला टप्प्याटप्प्यानं जात प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आता मी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. याबाबत त्यांच्याशीही चर्चा करणार आहे. माझ्या दोन-तीन कोर्टाच्या तारखा असल्यानं मी जरांगे पाटील यांना भेटून परत येईल, असंही आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं.
समाजाचं भलं व्हावं यासाठी प्रयत्न : जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं प्रशासन योग्यपणे कामाला लागलं आहे. 54 लाख नोंदी संदर्भात जरांगे पाटील आग्रही होते. त्या संदर्भात प्रशासकीय स्तरावर महसूल विभागाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. सरकारसुद्धा सकारात्मक दिसत आहे. खरंतर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश यावं, मराठा समाजाचं भलं व्हावं, इतकीच अपेक्षा असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
हे वाचलंत का :