अमरावती Makhala village : जांभूळ आणि आंब्याच्या झाडांनी वेढलेल्या परिसरात दुसऱ्या बाजूला खोल दरी. उन्हाळ्यात देखील ऊन जाणवत नाही तर 24 तास अगदी थंडगार हवा येथे असते. हिवाळ्यात गारठलेल्या निसर्गाचा आगळावेगळा आनंद आणि पावसाळ्यात चिंब झालेले हिरवेगार जंगल. बहरदार निसर्ग एकांत शांतता आणि छान गारवा असा सुखद अनुभव घेणारे स्थळ सातपुडा पर्वत रांगेत उंच टोकावर असणाऱ्या 'माखला' (Makhla Village) या गावात इंग्रजांनी थाटलेल्या खास विश्रामगृह परिसरात अनुभवायला येतो.
सुंदर निसर्गाची अनुभूती : सातपुडा पर्वत रांगेत उंच टोकावर 'माखला' गावात इंग्रजकालीन विश्रामगृह (Rest House) आहे. विश्रामगृहालगत असणाऱ्या माखलाच्या जंगलात कुंकू, आरंग, जांभूळ, वड, हिरडा, आंबा, मोह अशा प्रकारचे वृक्ष आहेत. रान चमेली, कारवी, माहोल इत्यादी वेली देखील आहेत.
असा आहे विश्रामगृहाचा परिसर : परतवाडा ते धारणी मार्गावर सेमाडोहा पासून दहा किलोमीटर अंतरावर उंच पहाडावर 'माखला' हे गाव वसलं आहे. 1857 च्या उठावानंतर इंग्रजांनी तात्या टोपे यांच्या शोधात पहिल्यांदा या भागात प्रवेश केला. समुद्र सपाटीपासून 974 मीटर उंचीवर अतिशय सुंदर असणाऱ्या या भागात राहण्यासाठी इंग्रजांनी सुमारे 11 चौरस किलोमीटरच्या भव्य अशा पठारी भागात खास विश्रामगृह येथे उभारलं. विविध प्रजातीच्या आंब्यांची 200 झाडं लावून या आमराईलगत अतिशय छान असं विश्रामगृह बांधण्यात आलं आहे. दाट जंगलात असणारं हे विश्रामगृह आमराईतील एक देखणी वास्तू असल्याची अनुभूती येत असल्याची माहिती, सातपुडा पर्वत रांगेतील इंग्रजकालीन विश्रामगृहाचे अभ्यासक प्रदीप हिरुरकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
असे आहे विश्रामगृह : उंच टेकडीवर आंब्याच्या वनामध्ये उंच जोथ्यावर हे विश्रामगृह उभारण्यात आलं आहे. चौफेर रुंद व्हरांडा, त्यावर लाल कौलाचं छप्पर, मध्यभागी एक मोठी खोली, त्यात मच्छरदाणी लावलेला पलंग कमी उंचीची दोन टेबल, त्यासमोर वेताच्या खुर्च्या, दोन मोठ्या आराम खुर्च्या अशी व्यवस्था या विश्रामगृहामध्ये आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उत्कृष्ट नमुना : मेळघाटात मुसळधार पाऊस कोसळत असला तरी दऱ्याखोरातून हे पाणी वाहून जात असल्यामुळं या भागात बाराही महिने पाण्याची टंचाई भेडसावते. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी विश्रामगृहाचं बांधकाम करताना विश्रामगृहाच्या डाव्या बाजूला चाळीस हजार लीटर क्षमतेच्या दोन टाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. विश्रामगृहाच्या छतावर पडणारं पावसाचं पाणी या टाक्यांमध्ये साठवलं जाईल अशी व्यवस्था या ठिकाणी आहे. पावसाळ्यात साठवलेलं पाणी सुमारे आठ महिने वापरण्याची व्यवस्था या विश्रामगृहात करण्यात आलीय.
अरण्य बेट अशी ओळख : विश्रामगृहालगत असणाऱ्या माखलाच्या जंगलात कुंकू, आरंग, जांभूळ, वड, हिरडा, आंबा, मोह अशा प्रकारचे वृक्ष असून रान चमेली कारवी माहोल इत्यादी वेली देखील आहेत. अर्धहरीतपर्णी जंगल म्हणून माखला ओळखलं जातं. सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाटच्या जंगलात एक समृद्ध अरण्य भेट म्हणून माखला ओळखलं जातं. वाघ, अस्वल, बिबट असे वन्य प्राणी देखील या परिसरात अनेकदा दिसतात.
विश्रामगृह पर्यटकांसाठी बंद : देश स्वतंत्र झाल्यावर माखला येथील विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होतं. 1996 मध्ये हे विश्रामगृह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आल्यापासून या ठिकाणी पर्यटकांना राहण्याची सुविधा बंद आहे. आता केवळ व्याघ्र प्रकल्पाचे कुणी अधिकारी वर्षातून एखादवेळी आले तर तेच या ठिकाणी राहतात. अतिशय सुंदर ठिकाण असणारं हे विश्रामगृह पर्यटकांसाठी खुलं झालं तर निसर्गप्रेमी पर्यटकांना अतिशय सुंदर अशा परिसरात राहण्याचा आनंद घेता येईल. व्याघ्र प्रकल्पांनी या संदर्भात विचार करावा असं अनेक निसर्गप्रेमींचं म्हणणं आहे. एकूणच या परिसरात एकदा भेट दिली तरी पर्यटकांना आगळीवेगळी अनुभूती निश्चितच येईल.
हेही वाचा