अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (29 ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता. बडनेरा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रवी राणा यांनी भव्य मिरवणूक काढून अर्ज दाखल केला. तर महायुतीसोबत बंडखोरी करत भाजपाचे तुषार भारतीय यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय. रवी राणा यांच्यासोबत भाजपाचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी तर तुषार भारतीय यांच्यासोबत मोठ्या संख्येनं भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. एकूणच रवी राणा आणि तुषार भारतीय यांच्यासोबत भाजपा फिफ्टी-फिफ्टी असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
निवडणुकीसाठी खास रणनीतीची गरज नाही : "महायुतीनं बडनेरा विधानसभा मतदारसंघ युवा स्वाभिमान पार्टीला अधिकृतरित्या सोडला असून या मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी स्वतः निवडणूकीच्या रिंगणात आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेला भाजपा नेते खासदार अनिल बोंडे यांच्यासह धामणगाव रेल्वे मतदार संघातील उमेदवार प्रताप अडसड तसंच भाजपाचे जवळपास सर्वच पदाधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते. माझी उमेदवारी ही खऱ्या अर्थानं जनतेची उमेदवारी आहे. माझी उमेदवारी म्हणजे अमरावती शहर आणि बडनेरा मतदार संघातील तरुण, तरुणी, महिला, वृद्ध या सर्वांच्या उज्वल भविष्याची उमेदवारी आहे. आज माझ्यासोबत अनेक महिला या पायात चप्पल न घालता आणि उपवास ठेवून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या. मी सतत पाच वर्ष जनतेत राहिलोय. त्यामुळं मला निवडणुकीसाठी खास रणनीती ठरवायची गरज भासत नाही," असं रवी राणा म्हणालेत.
कोण खंजीर खुपसतंय जनतेला ठाऊक : सध्या अनेकांनी बंडखोरी करून महाराष्ट्रात चुकीच्या अफवा पसरविणं, चुकीच्या पद्धतीचे वातावरण तयार करण्याचं काम सुरू आहे. मात्र जनतेला सर्व कळतं. कोण कोणाच्या सुपाऱ्या घेऊन उभा आहे आणि कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसतोय हे देखील जनता जाणून आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः माझी उमेदवारी घोषित केल्याच रवी राणा यांनी स्पष्ट केलं.
तुषार भारतीय म्हणतात पक्ष वाचवण्यासाठी लढाई : गेल्या 40 वर्षांपासून भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी पक्ष वाढीसाठी काम करतोय. 2009 मध्ये मी अचलपूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली, मात्र त्यावेळी ती मला पक्षानं दिली नाही. 2014 मध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघाची मी उमेदवारी मागितली मात्र त्यावेळी मला बडनेराची उमेदवारी पक्षानं दिली, तो पक्षादेश मी मानला. 2019 मध्ये युती झाल्यामुळं मी पुन्हा पक्षादेश मानला. आता 2024 मध्ये उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती. अतिशय वाईट परिस्थितीत आम्ही पक्षासाठी काम केलं. मात्र आयत्यावेळी एखादा संधीसाधू, कोणी उपरा, एखादा बाजारबुणगा येऊन कुठल्याही स्तरावर जाऊन पाठिंबा मागत असेल, तर आम्हाला आता पक्ष वाचवण्यासाठी ही लढाई लढावी लागेल, असं तुषार भारतीयल म्हणाले.
हेही वाचा