मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर, आज शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी दावा केला की, विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) एकूण 288 पैकी 160 ते 165 जागा जिंकेल आणि राज्यात स्थिर सरकार येईल. खासदार असलेल्या संजय राऊत यांनी असंही सांगितले की, शनिवारी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी महाविकास आघाडीचे नेते गुरुवारी म्हणजेच आज भेटतील. या बैठकीत पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात येईल.
यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं, "आम्ही आणि आमचे मित्र पक्ष, शेकाप, समाजवादी पार्टी, डावे पक्ष यासारख्या छोट्या पक्षांसह बहुमताचा आकडा ओलांडत आहोत. आम्ही 160-165 जागा जिंकत आहोत." राज्यात आमचं एक स्थिर सरकार असेल. मी हे अगदी आत्मविश्वासानं सांगू शकतो, असंही संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं.
काल मतदान संपल्यानंतर, बहुतांश एक्झिट पोलने महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे तर काहींनी महाराष्ट्रात MVA अर्थात महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करता येईल असं म्हटलं आहे.
राज्यात महाविकास आघाडी MVA मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT), काँग्रेस आणि शरद पवार यांच्या NCP (SP) यांचा समावेश आहे. तर सत्ताधारी महायुतीमध्ये भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. महायुती राज्यात सत्ता टिकवण्याचा निर्धार करत असताना, विरोधी MVA राज्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळेल अशी आशा करत आहे.
सध्या देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अंदाजे 65 टक्के मतदान झालं. तर 2019 च्या माहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 61.74 टक्के मतदान झालं होतं.
हेही वाचा..