मुंबई Sanjay Raut On MVA : लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसीय दिल्ली दौरा केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'इंडिया' आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या रणनीतीविषयी चर्चा केली. दरम्यान महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत सुरू असून खोके सरकारला राज्यातून घालवायचं असल्याचा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला.
सरकारला लोकशाहीने लोकशाहीच्या मार्गाने सत्तेतून बाहेर काढायचं: "पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यातील भेटीगाठी राजकीय होत्या. ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटी घेऊन सविस्तर चर्चा केली. 16 ऑगस्टला तीन पक्षांचा मेळावा असणार आहे. महाविकास आघाडी ही देशातील एकमेव अशी आघाडी आहे की त्यांच्यात समन्वय आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना हातात हात घालून गेलं पाहिजे. कोणतीही मतभिन्नता असता कामा नये, कोण मोठा, कोण छोटा, कोण मधला ही भूमिका असता कामा नये. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसूनच निर्णय घ्यायचं, ओढाताण करायची नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील खोके सरकार घालवायचं आहे. भारतीय जनता पार्टीला राज्यातून पूर्णपणे हद्दपार करायचं आहे. या सरकारला शेख हसीनाप्रमाणे नाही तर लोकशाही मार्गाचा अवलंब करत पळवून लावायचं आहे." असं संजय राऊत यांनी म्हटलं.
आदानी नाहीत तर धारावी चर्चेचा विषय : देशात अदानीपेक्षा महत्त्वाचा धारावी पुनर्वसन प्रकल्प आहे आणि तोच चर्चेचा विषय आहे. निवडून आलोत तर राज्यातील आठ लाख लोकांना घरं द्यायची आहेत आहे. हा देशातील सर्वात मोठा हा गृह प्रकल्प असेल. हा प्रकल्प 590 एकर जमीनीवर उभा राहणार आहे. एफएसआय सर्टिफाइड बिल्डरलाच तो मिळेल. बिल्डर कुणीही असो मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाची भूमिका एवढीच आहे की, टेंडरबाह्य गोष्टींना विरोध करण्याचं धोरण कायम ठेवण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसंच प्रकल्पग्रस्तांना घरं मिळालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा