पुणे Devendra Fadnavis : मोशी येथील इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''महाराष्ट्रात २०१७ मध्ये एअरोस्पेस आणि डिफेन्स धोरण तयार केले आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी १ हजार कोटीचा निधी तयार करण्यात आला. त्यातून ६०० एमएसएमई तयार झाल्या आहेत. केवळ ३०० कोटीतून १२ ते १५ हजार कोटींचे मूल्य या उद्योग संस्थांनी तयार केले. आज जगातले सगळे देश संरक्षण क्षेत्रात भारतासोबत काम करण्यास तयार आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईसाठी अधिक सुविधा आणि सवलती देण्याचे धोरण स्वीकारण्यात येईल. रोजगार निर्मितीसोबत चांगली शस्त्रास्त्रे राज्यात तयार होतील याचेही प्रयत्न करू.''
'मेक इन इंडिया' मुळे देशाची संरक्षण सिद्धता वाढली: ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची शक्ती ओळखली. आपला देश शस्त्रास्त्रांसाठी परदेशावर अवलंबून होता. आज जगाच्या पाठीवर सामरिक शक्तीत पहिल्या पाचमध्ये असलेले देश स्वत:ची संरक्षण सामग्री स्वत:च्या देशात तयार करून जगाला निर्यात करतात. हीच क्षमता देशात निर्माण करण्यासाठी 'मेक इन इंडिया' वर भर देण्यात आला. भारताने शस्त्र निर्यात करणाऱ्या देशांसाठी त्याचा काही भाग भारतात उत्पादन करावा लागेल आणि निर्मिती तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करावे लागेल, अशी अट ठेवली. म्हणून देशात संरक्षण उत्पादन क्षमता निर्माण झाली. जगातील उत्तम शस्त्रसामुग्री देशात निर्माण होत आहे. यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत. आपली वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे. विमान आणि युद्धनौकेसाठी लागणारा ३० टक्के दारुगोळा भारतात तयार होत आहे,'' असेही फडणवीस म्हणाले.
पुणे देशाच्या सामरीक दृष्टीने महत्त्वाचे केंद्र: ''पुणे हे भारताच्या सामरीक शक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र असून गेल्या अनेक वर्षांत संरक्षण उत्पादनाची चांगली व्यवस्था पुण्यात निर्माण झाली आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रणी आहे. देशाच्या वायुसेनेचे मेंटेनन्स कमांड, लष्कराचे दक्षिण कमांड, नौदलाचे मुंबई डॉकयार्ड महाराष्ट्रात आहे. नाशिकमध्ये हिंदुस्थान एअरोनॉटीकल्समध्ये तेजस आणि सुखोई अशी लढाऊ विमाने तयार होतात. माझगाव डॉकमध्ये जहाज बांधणीची आधुनिक व्यवस्था आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्ससारखी संरक्षण क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानयुक्त काम करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे,'' असं मत देवेंद्र फडणवीसांनी मांडलं.
बीडीएल मिसाईल उत्पादन युनिट: ''अमरावतीजवळ बीडीएल मिसाईल उत्पादन युनिट सुरू होत आहे. चंद्रयान-३ करिता भंडाऱ्याच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काही भाग बनले. राज्यात ११ ऑर्डीनन्स फॅक्टरी, ५ डिफेन्स पीएसयु, ८ विविध प्रकारच्या प्रयोगशाळा आहे. पुण्यात डिआरडीओची सर्वोत्तम सुविधा आणि देशाची महत्त्वाची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीदेखील आहे. म्हणून एमएसएमईसाठी महत्त्वाचे स्थान महाराष्ट्र आहे आणि राज्यात पुणे आहे,'' अशी माहिती फडणवीसांनी दिली.
हेही वाचा:
- लोकसभा निवडणूक 2024; भाजपा प्रत्येक लोकसभेला करणार कोट्यवधींचा खर्च, हा पैसा येतो कुठून? रोहित पवारांचा सवाल
- 'महाराष्ट्र आता नव्या क्रांतीसाठी तयार झाला'; 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पाटलांचा हल्लाबोल
- नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का : अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात 55 माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश