मुंबई - विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी केवळ १ दिवसाचा अवधी शिल्लक असताना अजूनही महाविकास आघाडी किंवा महायुतीने आपल्या मित्र पक्षांना एकही जागा सोडली नसल्याने मित्र पक्षांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जातेय. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांनी महाविकास आघाडी अथवा महायुतीला मोलाची साथ दिली होती. कुठल्याही जागेची अपेक्षा न करता त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपला योग्य तो सन्मान राखला जाईल, या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत तशी पावलं उचलली होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत रामदास आठवले यांची रिपाइं, अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी, जयंत पाटील यांची शेकाप, माकप, भाकप या घटक पक्षांना दोन्ही बाजूने योग्य तो सन्मान दिल्या कारणाने यंदाच्या निवडणुकीत यांनी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलाय. परंतु याचा मोठा फटका दोन्ही आघाड्यांना बसणार आहे.
समाजवादी पक्षाची किमान ५ जागांची मागणी : आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा मोठा फायदा महाविकास आघाडीला झालाय. विशेष करून मुस्लिम मतांच्या जोरावर अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली आणि त्यांचे उमेदवार निवडून येण्यास मदत झाली. परंतु आता विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला मुस्लिम मतांचा विसर पडला असल्याचे दिसून येतेय. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत १३ खासदारांसह काँग्रेस नंबर एक पक्ष झाला, त्याच पद्धतीने महाविकास आघाडीच्या यशात आपल्या मतदारांचा मोठा वाटा असल्याचं समाजवादी पक्षाला समजून चुकलंय. याच कारणाने त्यांनी महाविकास आघाडीकडे धुळे शहर, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, मालेगाव मध्य, मानखुर्द अशा पाच जागांची मागणी केली होती. याकरिता समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आजमी यांनी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यात. यातून अखेरच्या क्षणापर्यंत कुठलाही सकारात्मक तोडगा निघाला नाही. इतकंच नाही तर अबू आझमी यांनी मागणी केलेल्या ५ पैकी यापैकी ३ जागांवर उद्धवसेना आणि काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केलेत.
काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा: उद्धव ठाकरे गटाकडून धुळ्यात माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर काँग्रेसकडून मालेगाव मध्यमधून एजाज बेग आणि भिवंडी पश्चिममधून दयानंद चोरघे यांना उमेदवारी दिली गेलीय. या कारणाने समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी महाराष्ट्रात २५ जागा लढण्याचा निर्धार केलाय. आज अबू आझमी यांनी स्वतः मानखुर्द शिवाजीनगरमधून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यापूर्वी अबू आझमी मानखुर्द शिवाजीनगरमधून तीन वेळा निवडून आले आहेत. २०१९ मध्ये समाजवादी पक्षाने राज्यात ४ जागा लढवल्या होत्या. तेव्हा मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आझमी तर भिवंडी पूर्वमधून रईस शेख निवडून आले होते.
महायुतीचा प्रचार न करण्याचा निर्णय : दुसरीकडे महायुतीकडून अजिबात प्रतिसाद भेटत नसल्याकारणाने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बंडाचा पवित्रा घेतलाय. रामदास आठवले यांच्या रिपाइंला महायुतीत जागा वाटपात पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आलं. याकरिता त्यांनी महायुतीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटचा पर्याय म्हणून रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची त्यांच्या "सागर" या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांना याबाबत पत्रही दिलंय. याबाबत रामदास आठवले यांनी ट्विरवरून माहितीही दिलीय. महायुतीत रिपाइंचा योग्य तो सन्मान होत नसल्याने कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात नाराज असल्याचं त्यांनी म्हटलंय. रामदास आठवले यांच्या म्हणण्यानुसार, आमचा पक्ष छोटा जरी असला तरीसुद्धा आम्हाला महायुतीत जागा हव्यात. विधानसभा निवडणुकीत रिपाइंला ४ ते ५ जागा हव्यात. धारावी, चेंबूर, नांदेड अशा जागांची आमची मागणी आहे. २०१२ मध्ये आम्ही भाजपासोबत आलोय. परंतु त्यानंतर कुठेही रिपाइं दिसत नाही. केंद्रात मी मंत्री असल्याकारणाने इतर राज्यांमध्येदेखील पक्षाच्या जागा वाढवतोय. असं असतानाही आमचा योग्य तो सन्मान राखला जात नसल्याकारणाने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर दुसरीकडे महादेव जानकर यांचा रासप तसेच बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती यापूर्वीच महायुतीतून बाहेर पडलाय. एकंदरीत यंदाच्या निवडणुकीत मित्र पक्षांचा मोठ्या प्रमाणात विसर हा महायुती आणि महाविकास आघाडीला पडला असून, याचा परिणाम निकालानंतर स्पष्ट होईल.
हेही वाचा :