मुंबई - महायुती सरकारनं दुसऱ्यांदा सरकार स्थापन करीत रविवारी 16 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार केलाय. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय. यामध्ये भाजपाकडून सर्वाधिक 19 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय. तर शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळात अनेकांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात अत्यंत संघर्षमयरीत्या सुरुवात केलीय. राजकीय क्षेत्रात येण्याअगोदर अनेक मंत्र्यांनी कोणी रिक्षा चालवण्याचे काम केलंय, कोणी पानटपरी चालवलीय, तर कोणी साखर कारखान्यात मजूर म्हणून काम केलंय. अशा मंत्र्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. पाहू यात मंत्रिमंडळात असे कोण कोण मंत्री आहेत.
रिक्षावाला ते मंत्री : 2022 मध्ये मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केले होते. यावेळी अनपेक्षितरीत्या त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. त्यावेळी एक रिक्षावाला ते मुख्यमंत्री असं बिरुद एकनाथ शिंदेंच्या नावापुढे लावण्यात आलं होतं. आताही एकनाथ शिंदेंना एक रिक्षावाला ते उपमुख्यमंत्री असं म्हटलं जातं. मात्र रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात तीन रिक्षावाले आहेत. ज्यांनी सुरुवातीला रिक्षा चालवत आपला उदरनिर्वाह केलाय. तसेच राजकीय जीवनाच्या आधी त्यांनी रिक्षा चालवलीय. यात भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेचे संजय शिरसाट आणि प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी लग्नाच्या निर्णयावरून कुटुंबात वाद झाल्यामुळं काही काळ रिक्षा चालवली होती, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळं एक रिक्षावाला ते मंत्री अशी बावनकुळे यांची ओळख झालीय. याचसह शिवसेनेचे संजय शिरसाट यांनीही सुरुवातीला काही काळ रिक्षा चालवली होती. बाळासाहेबांच्या विचाराने ते भारावून जाऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कालांतराने राजकीय जीवनात त्यांनी प्रगती केलीय. आणखी एक उदाहरण म्हणजे शिवसेनेचे प्रताप सरनाईक आहेत. सरनाईक यांनी 1997 मध्ये राजकारणात प्रवेश केला. पण त्यापूर्वी त्यांनी रिक्षा चालवत आपला संसाराचा गाडा चालवला होता. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि प्रताप सरनाईक यांचा रिक्षावाला ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास नवोदित राजकारणात प्रवेश करण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.
पान टपरीवाला ते मंत्री : दुसरीकडे मंत्रिमंडळात रिक्षावाला असताना मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील यांच्या रूपाने पान टपरीवालादेखील आहे. गुलाबराव पाटील यांचा प्रवास अत्यंत खडतर आहे. त्यांनी आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात संघर्ष केलाय. गुलाबराव पाटील यांनी गेल्या सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री या खात्याचा कारभार सांभाळलाय. जळगाव येथील पाळधी या खेड्यात गुलाबराव पाटील यांनी पानटपरी चालवलीय. 'नशीब' पान टपरी, असं त्यांनी पान टपरीचे नाव ठेवले होते. तरुण वयात बाळासाहेब यांच्या विचाराने प्रभावित होऊन शिवसेनेच्या कामाला सुरुवात केलीय. नंतर तरुण, तडफदार आणि कट्टर शिवसैनिक अशी गुलाबराव पाटलांची ओळख झालीय. 1999 साली पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेलेत. त्यानंतर मागील सरकारमध्ये ते मंत्री होते आणि आताही ते मंत्री झालेत. त्यामुळं गुलाबराव पाटील यांचा पानटपरी ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास नक्कीच तरुणांसाठी आदर्शवत असाच आहे.
कष्टकरी ते मंत्रिपद : एकीकडे मंत्रिमंडळात रिक्षावाला, पान टपरीवाला असताना दुसरीकडे एक कष्टकरी सुद्धा मंत्रिमंडळात आहे. कोल्हापूरचे राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सुरुवातीला काहीकाळ साखर कारखान्यात मजूर म्हणून काम केले होते. यानंतर त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. हळूहळू राजकारणात मोठ्या पदावर संधी मिळत गेली. पुढे आमदार झाले. मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकून यावेळीही त्यांना निवडून दिले. रविवारी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे एक कष्टकरी, मजूरही मंत्री होऊ शकतो हे प्रकाश आबिटकरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय.
हेही वाचा :