राहुरी (अहिल्यानगर) : सध्या शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी प्रयोगशील शेती करत आहेत. तसंच अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना बगल देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. अशाच एका शिक्षक दाम्पत्यानं इंटरनेटच्या मदतीनं राहत्या घरात केशर शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय.
नव्या प्रयोगाला उभारी मिळाली : राहुरी तालुक्यातील एका शिक्षक दाम्पत्यानं राहत्या घरातील एका खोलीत काश्मीर येथील मोगरा जातीच्या केशरची शेती केलीय. या शिक्षक पती-पत्नीला केशर शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळू लागल्यानं एका नव्या प्रयोगाला उभारी मिळाली आहे.
कसा केला केशर शेतीचा प्रयोग? : चिंचकर यांना शेती करण्याची आवड मात्र घरी शेती नव्हती. त्यात पती-पत्नी दोघेही शिक्षक आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती. यातूनच गुगलवर केशर शेतीबद्दलची माहिती मिळाली. तब्बल दोन वर्ष अभ्यास केल्यानंतर या शिक्षक पती-पत्नीनं घरातच केशर शेती करण्याचा निर्णय घेतला. केशर शेतीला पूरक असलेलं हवामान, तापमान, हवेतील ओलावा, कार्बन डाइऑक्साइड असं वातावरण मर्यादित जागेत तयार केलं. त्यासाठी आवश्यक असणारे केशराचे कंद त्यांनी थेट काश्मीर येथून मागवले. तंत्रज्ञानाचा वापर करून काश्मीर सारखं वातावरण त्यांनी राहत्या घराच्या एका बंद खोलीत तयार केलं. हवेतील ओलावा आणि नियंत्रित तापमान यांच्या आधारावर अगदी दोनच महिन्यात त्यांच्या केशराला फुले आली. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील 11 फूट बाय 15 फुटाच्या एका बंद खोलीत केशर पिकवण्याची किमया साध्य करून कृषी क्षेत्रात एक नवीन प्रयोग केला.
जगातील सर्वोत्तम मोगरा केशर : आज किरकोळ बाजारात एक ग्रॅम केशरची किंमत 700 ते 800 रुपये इतकी आहे. मागणी जास्त आणि उत्पादन कमी, यामुळं केशराला चांगला भाव मिळत आहे. काश्मीर येथील मोगरा केशर हे जगातील सर्वोत्तम केशर समजलं जातं. भारताच्या केशराच्या मागणीपैकी फक्त आठ ते दहा टक्के मागणी आपण पूर्ण करू शकतो. बाकी केशर इराण आणि स्पेन या देशातून आयात केलं जात असल्याची माहिती, निलिमा चिंचकर यांनी दिली.
वर्षातून एकदा येतात फुले : एरोपोनिक्स तंत्रज्ञानासाठी रुम बनवण्याचा खर्च हा एकदाच करावा लागतो. काश्मीरहून जे कंद मागवले जातात. त्या एका कंदाचे पुढच्या वर्षी चार कंद तयार होतात. त्याला वर्षातून एकदा फुले येतात. त्या फुलांवर ते केशर येते. नंतर ते काढून एकत्रित केलं जातं. उत्पन्न अत्यंत कमी निघालं तरी त्यांची किंमत बाजारात जास्त असते. या केशरला 'लाल सोनं' असं देखील संबोधलं जातं.
'लाल सोने' म्हणून केशरची ओळख : केशराच्या अधिक किमतीमुळं त्याचा 'लाल सोने' असा उल्लेख केला जातो. खाद्यपदार्थांसह केशराचा सौंदर्यप्रसाधने तसंच औषधांमध्येही वापर केला जातो. भारतात केशरला भरपूर मागणी असून त्या तुलनेत उत्पादन खूप कमी आहे. त्यामुळं इराणसह अन्य देशांकडून ते आयात केलं जातं.
शेतीचा यशस्वी प्रयोग : हवामान बदलामुळं वीस वर्षात केशरच पीक 60 टक्क्यांनी कमी झालं आहे. केशराचं पीक हे काश्मीरमध्ये घेतलं जातं. त्यासाठी योग्य तापमान आणि हवेतील ओलाव्याची आवश्यकता असते. वातावरणातील हवामान बदलामुळं आता काश्मीरमध्ये केशराचं उत्पादन कमी होतं आहे. वातावरण नियंत्रित करून आपण कोणत्याही भागातलं पीक भारताच्या कोणत्याही ठिकाणी घेऊ शकतो. केशर शेती हे त्यापैकीच एक आहे, या तंत्रज्ञानाला एरोपोनिक्स तंत्रज्ञान असं म्हणतात. आता केशर शेती ही फक्त काश्मीरपुरती मर्यादित राहिली नसून राहुरीत देखील याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.
250 ग्रॅम केशरचं मिळालं उत्पन्न : केशर शेती करण्याआधी काश्मीरच्या केशर उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. जून 2024 ला 300 किलो केशर कंद काश्मीर येथून मागवले. केशर शेती उभी करण्यासाठी एकूण सहा लाखांचा त्यांना खर्च आला. त्यांनी 250 ग्रॅम केशरचं उत्पन्न मिळवलं असून 800 ते 1000 रुपये ग्रॅम प्रमाणे केशरची विक्री सुरू झाली. पुढील वर्षी चौपट उत्पन्न मिळणार असल्याची अपेक्षा नीलिमा चिंचकर यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -