मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यात महायुतीनं बाजी मारल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
हा ऐतिहासिक दिवस : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "ही लोकांनी लोकांच्या हातात घेतलेली निवडणूक होती. लोकांनी आमच्यावर मतांचा प्रेमाचा वर्षाव केला. आम्ही राज्यात जे काम केलं, जे निर्णय आम्ही घेतले ते आत्तापर्यंतच्या इतिहासात न भूतो न भविष्य आहेत. मविआचे कामावरील स्टे आम्ही काढले, विविध विकास कामं आम्ही केली, आम्ही विकासाला प्राधान्य दिलं. राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही डोळ्यासमोर ठेवलं. कल्याणकारी योजना आम्ही आणल्या. लाडकी बहीण योजनेवर करण्यात आलेल्या आरोपांना आम्ही सामोरे गेलो. हे देणारं सरकार आहे. फक्त बोलणारं सरकार नाही यावर लोकांनी विश्वास ठेवला. सीएम म्हणजे कॉमन मॅन हा आमचा नारा असून आमची नियत साफ आहे. घरी बसून सरकार चालवता येत नाही हे स्पष्ट झालंय", असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसंच लाडक्या बहिणींना सावत्र भावांना जोडा दाखवला, असंही ते म्हणाले.
अजित पवार यांची प्रतिक्रिया : महायुतीच्या यशावर बोलताना अजित पवार म्हणाले, "महाराष्ट्रात कोणत्याही आघाडीला एवढं यश मिळालेलं नाही. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. आम्ही आर्थिक शिस्त आणणार आहोत. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. सगळीकडं महायुती पुढं चालली आहे."
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? : यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक आहोत. हा जबाबादारी वाढवणारा विजय असून जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला. तसंच विश्वासाला तडा जाऊ देणार नाही."