मुंबई- काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोयाबीन उत्पादकांना संसदेत जे आश्वासन दिले, त्याची पूर्तता केलेली नाही. सोयाबीन उत्पादनात राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर सोयाबीनला प्रति क्विंटल एमएसपी सात हजार रुपये दर देणार असल्याची माहिती काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव शुक्ला यांनी दिलीय. राज्यातील तरुणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलीय. सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलंय, मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर अंमली पदार्थाच्या विरोधात कठोर कायदा करण्यात येईल, असे आश्वासन शुक्ला यांनी मुंबईत राजीव गांधी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिलंय.
प्रति क्विंटल 7 हजार रुपये दर : सोयाबीन उत्पादनासाठी शेतकऱ्यांना 4 हजार रुपये लागतात, अशा वेळी त्यांना प्रति क्विंटल 4 हजार रुपये दिल्यावर शेतकरी जगणार कसा, असा प्रश्न उपस्थित करून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर प्रति क्विंटल 7 हजार रुपये दर देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिलीय. राज्यातील विधानसभा निवडणूक महत्त्वाची असून, सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेली ही निवडणूक आहे. महायुती सरकार तोडफोड करून आणि धोका, विश्वासघात करून बनवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, मुंबई काँग्रेसचे खजिनदार संदीप शुक्ला, प्रवक्ते निजामुद्दीन राईन उपस्थित होते.
मोदींनी ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना सोबत घेतले : महायुती सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचा भस्मासुर असल्याची टीका त्यांनी केलीय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करतात आणि दुसरीकडे काही दिवसांतच त्यांना उपमुख्यमंत्री बनवतात, अशी टीका त्यांनी केलीय. ज्यांनी शिवाजी महाराजांना भ्रष्टाचारापासून सोडले नाही, ते कुणाला सोडणार नाहीत, अशी टीका त्यांनी केलीय. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यांतच कोसळतो, यामध्ये सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महायुती सरकार केवळ मोठ्या उद्योगपतींसाठी कार्यरत आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडलंय. त्यांनी मराठी अस्मितेसोबत खेळ चालवलाय. त्यांच्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा नाही, राज्यातील सर्व महत्त्वाच्या बाबी गुजरातला नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट लपून राहिलेले नाही, असा आरोप राजीव शुक्ला यांनी राज्य सरकारवर केलाय.
हेही वाचा :