शिर्डीः राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून, आता सगळ्यांनाच मतमोजणीची प्रतीक्षा आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येतोय. परंतु उद्या निकाल लागल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीला राज्यात 160 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.
महायुतीला 160 हून अधिक जागा मिळणार : विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर उद्या निकालाची धाकधूक सगळ्यांनाच लागली आहे. त्या आधी राजकीय नेते देव-दर्शनाला येत असल्याचं दिसून येतंय. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही आज शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलंय. महायुतीला 160 हून अधिक जागा मिळणार असल्याने राज्यात सत्ता स्थापनेला वेळ लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करत सरकार बनविण्यासाठी कोणाला बरोबर घेण्याची वेळच येणार नाही, असंही भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवलंय.
आमचं तर सर्व दिल्लीतच ठरणार : मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय हा दिल्लीतच होणार आहे. आमचं तर सर्व दिल्लीतच ठरणार आहे. आमच्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार सामील झालेत, पण त्यांचीसुद्धा दिल्लीवर श्रद्धाच नव्हे, तर दिल्लीवर विश्वास आहे. दिल्लीवाले आपलं भलंच करतील हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीतूनच ठरेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणालेत. महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल, महायुतीचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे पी नड्डा ठरवतील. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असं वाटत असतं, असंही ते म्हणालेत.
आम्ही घटनेप्रमाणे काम करतोय : पत्रकारांनी त्यांना वाढलेल्या मतदानावर राऊतांनी आक्षेप घेतल्याचं विचारलं असता ते म्हणाले, संजय राऊत हे माझे मित्रच आहेत. संजय राऊतांना अनेकदा असे प्रश्न पडत असतात. आम्ही घटनेप्रमाणे काम करीत आहोत, संजय राऊतांना संविधानाने निर्माण केलेल्या संस्था मान्य नाहीत, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.
हेही वाचा -