मुंबई - 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. निकाल लागून आता जवळपास एक आठवड्याहून जास्त काळ झाला तरी अद्यापही विरोधी पक्षाकडून EVM मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जातोय. आता 5 डिसेंबरला नवे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. या निवडणुकीत महायुतीला 230 हून अधिक जागा मिळाल्यात. तर महाविकास आघाडीला 50 चा आकडादेखील पार करता आलेला नाही. त्यानंतर विरोधी पक्षाकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातेय. याला आता निवडणूक आयोगानंच उत्तर दिलंय.
ईव्हीएम हॅक करता येते? : 30 नोव्हेंबर रोजी रिटायर्ड विंग कमांडर अनुमा आचार्य यांनी एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये दोघे जण व्हिडीओ कॉलवर बोलत असून, त्यातील एक जण ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो, असा दावा करीत आहे. व्हिडीओतील व्यक्ती काही राजकीय पक्षांच्या बाजूने निकाल बदलू शकतो, असा दावादेखील करताना दिसतेय. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून, काही राजकीय नेत्यांनीही शेअर केलाय. सदर व्हायरल व्हिडीओची गंभीर दखल महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली असून, त्यांनी एक निवेदन जारी केलंय. आपले म्हणणे आयोगाने सोशल मीडियाद्वारे मांडले असून, आयोगाने म्हटले आहे की, सदर व्हिडीओतील दावे पूर्णपणे निराधार, खोटे आणि सिद्ध न झालेले आहेत. मुंबई सायबर पोलिसांनी या व्हिडीओमध्ये दाखवलेल्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला असल्याचे देखील निवडणूक आयोगाने म्हटलंय.
व्हायरल व्हिडीओतील सदर व्यक्ती विरोधात गुन्हा : निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनानुसार, त्यांनी व्हायरल व्हिडीओतील सदर व्यक्ती विरोधात लावलेल्या कलमांचीदेखील माहिती दिलीय. भारतीय न्याय दंड संहिता 2023 च्या कलम 318/4 आणि आयटी कायदा 2000 च्या कलम 43 (सी) आणि कलम 66 (डी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलंय. ईव्हीएममध्ये पूर्णपणे छेडछाड प्रतिबंधक असून, ते कोणत्याही नेटवर्कशी जोडले जाऊ शकत नाहीत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अनेक वेळा ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केलाय.
गैरसमज दूर करण्यासाठी FAQ प्रकाशित : निवडणूक आयोगाने पुढे म्हटले आहे की, जनतेला EVM मशीनबाबत कोणत्याही शंका आणि गैरसमज असतील तर त्या विचाराव्यात. लोकांच्या मनातील या शंका आणि गैरसमज दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर तपशीलवार FAQ प्रकाशित केलेत. सोबतच या व्हायरल व्हिडीओत EVM मशीन हॅक करण्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या देशातून बोलणाऱ्या व्यक्ती विरोधात अशाच एका प्रकरणात 2019 मध्ये देखील दिल्ली पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
हेही वाचा-