मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेनं चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला पत्र लिहिलंय. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी साबरमती मध्यवर्ती कारागृहात पत्र पाठवत लॉरेन्स बिश्नोईला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढण्याची ऑफर दिली आहे. इतकंच नाही तर सुनील शुक्ला यांनी बिश्नोईची तुलना थेट भगतसिंग यांच्याशी केली आहे.
![assembly election 2024](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/22-10-2024/22734183_bishnoi-letter.jpg)
पत्रात काय म्हटलंय? : शुक्ला यांनी पत्रात बिश्नोईचं कौतुक करत त्याला 'क्रांतिकारक' म्हणून संबोधलय. तसंच बिश्नोईच्या राजकारणातील प्रवेशामुळं महत्त्वपूर्ण बदल घडू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. पत्रात म्हटलंय की, “आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवावी असा आमचा प्रस्ताव आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तुमच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत. आम्ही फक्त तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतोय. आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आमच्या पक्षाच्या मूल्यांशी सुसंगत असलेल्या कारणाचे प्रतिनिधित्व करता. तुमचा विजय निश्चित करण्यासाठी आमचा पक्ष कोणतीही कसर सोडणार नाही,”
गांधींसोबत लॉरेन्स बिष्णोईची तुलना केली नाही. आम्ही भगतसिंग यांच्यावर प्रेम करतो. त्यामुळं लॉरेन्स बिष्णोईची तुलना आम्ही भगतसिंग यांच्याशी केली. : संजय खन्ना - राष्ट्रीय महासचिव, उत्तर भारतीय विकास सेना
![maharashtra assembly election 2024](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/22-10-2024/22734183_lawrence.jpg)
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई? : लॉरेन्स बिश्नोईचं (वय 31) नाव 29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर देशासमोर आलं. मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गॅंगनं स्वीकारली होती. त्यानंतर अनेक प्रकरणांमध्ये लॉरेन्स बिश्नोई हे नाव पुढं आलं. असं असताना 12 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. सिद्दीकी हे अभिनेता सलमान खानसह बॉलीवूड स्टार्सशी असलेल्या घनिष्ठ संबंधांसाठी प्रसिद्ध होते. माध्यमांतील माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईचं खरं नाव सतविंदर सिंग असून त्याचा जन्म 1993 मध्ये पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात झाला. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये कैद आहे. मात्र, असं म्हटलं जातं की तुरुंगातूनही तो त्याच्या गँगला नियंत्रित करतो.
हेही वाचा -