मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनं भरभरून मत दिलंय. महायुतीच्या बाजूंनी कौल लागला आहे. निवडणूक निकाल लागून एक आठवडा उलटून गेल्यानंतरही महायुतीचे सरकार अजून स्थापन होत नाहीये. पण अखेर आता गुरुवारी 5 डिसेंबर रोजी शपथविधीचा मुहूर्त ठरला असून, मुंबईतील आझाद मैदान येथे 5 डिसेंबर रोजी भव्य-दिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. एकीकडे शपथविधीला काही तास शिल्लक असताना दुसरीकडे मात्र महायुतीत अजूनही मुख्यमंत्रिपदावरून नाव निश्चित होत नाही. मात्र आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
बावनकुळे, दरेकरांनी घेतला आढावा : 5 डिसेंबर रोजी महायुतीचा भव्य-दिव्य असा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दरेकरांनी आझाद मैदानावरती जाऊन शपथविधी सोहळ्याचे कशा प्रकारे तयारी सुरू आहे, काम कुठपर्यंत आले आहे, याचा आढावा घेतला जातोय. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनीही शपथविधी सोहळ्याचे कशा प्रकारे काम सुरू आहे याचा प्रत्यक्ष आझाद मैदान येथे जाऊन आढावा घेतला. दरम्यान, मंगळवारी भाजपाची बैठक होणार असून, या बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार आहे. एकीकडे मात्र महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून नाव निश्चित होत नसताना दुसरीकडे मात्र आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या तयारीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं सध्या तरी चित्र दिसतंय.
विविध मान्यवर अन् सेलिब्रिटींना आमंत्रण : 5 डिसेंबर रोजी महायुतीचा भव्य-दिव्य असा शपथविधी सोहळा होणार आहे. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच तिन्ही पक्षातील काही मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच भाजपाचे सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष तसेच महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनाही या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त धार्मिक क्षेत्रातील महंत, साधू आणि संत यांनाही या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळं पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याकडे राज्यासह देशभरातील सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :