मुंबई: महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आजच्या विधिमंडळातील आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला असून, आज विरोधकांपैकी कोणीही आमदार शपथ घेणार नसल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना दिलीय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाही हे तर निश्चित आहे, मात्र शपथ घ्यायची की नाही याचा निर्णय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील प्रभू आणि महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते.
निषेध म्हणून आज शपथ घेतली जाणार नाही - ठाकरे : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, निषेध म्हणून आज शपथ घेतली जाणार नाही. हा निकाल म्हणजे जनतेने दिलेले की आयोगाने दिलेले मँडेट आहे, याबाबत लोकांमध्ये संशय आहे. इतका मोठा विजय झाला, मात्र विजयाचा कुठेही जल्लोष नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मारकडवाडी मॉक पोल प्रकरण ही जनतेच्या मनातील शंका आहे. मात्र सरकार तेथील जनतेवर दबाव टाकत आहे, स्थानिक 20 जणांना अटक केलीय. विशेष म्हणजे विजयी उमेदवारदेखील या विरोधात जनतेच्या सोबत आहेत.
लोकशाही चिरडण्याचे काम आधीपासूनच सुरू : आम्ही जिंकलो असलो तरी आयोगाबाबत शंका आहे. त्यामुळे जनतेचा मान राखून आज शपथ घेतली जाणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट केलंय. लोकशाही चिरडण्याचे काम आधी सुरू झाले होते, 2014 नंतर संस्था संपवण्याचे काम सुरू झाले. मारकडवाडी अटकेचा दडपशाहीचा त्यांनी निषेध केलाय. मारकडवाडी येथील मतपत्रिकेवर मतदान घ्यायचा निर्णय घेतला, मात्र निवडणूक संपल्यावर आयोगाचे तिथे काय काम होते, असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय. लोकशाहीवर वरंवटा फिरवण्याचे काम सरकार करीत आहे, असा आरोप त्यांनी केलाय. निवडणूक आयोगाने व्यवस्थित नियोजन करून दिलेली व्यवस्था आम्ही उद्ध्वस्त करणार आहोत. राज्यातील जनतेने मनावर घेतले आणि राज्यात हे लोण पसरेल म्हणून सरकारकडून लोकशाही वाचवण्यासाठी दबाव आहे. आम्ही मारकडवाडी नागरिकांच्या पूर्ण पाठीशी असल्याचंही ते म्हणालेत.
राज्यात शोककळा पसरल्याची भावना : विजय वडेट्टीवार यांनी राज्यात जो उत्साह हवा तो कुठेही नाही, राज्यात शोककळा पसरल्याची भावना व्यक्त केलीय. दाल मे कुछ काला नही, तो पुरी दाल काली है, असे ते म्हणालेत. आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी दबाव टाकला जात असल्याची टीका त्यांनी केलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शपथ घ्यायची का नाही याचा निर्णय पवार आणि ठाकरेंच्या सोबतच्या चर्चेनंतर करण्यात येईल, असे स्पष्ट केलंय. मोदी सरकारमध्ये जवान आणि शेतकऱ्यांना मारले जात आहे. मतदानाचा अधिकार काढून घेतला जात आहे. मारकडवाडीने राज्यातील जनतेच्या मनातील खदखद बाहेर आणली. आम्ही निवडून आलेले आमदार आहोत. मात्र आज शपथ घेणार नाही आणि शपथ घ्यायची की नाही याचा निर्णय शरद पवार, उद्धव ठाकरेंशी बोलून घेणार, असे त्यांनी स्पष्ट केलंय. सत्ताधाऱ्यांनी राज्याभिषेकासारखा शपथविधी सोहळा केलाय, त्यावर कोट्यवधींचा खर्च झाल्याची टीकाही त्यांनी केलीय.
हेही वाचा :