मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस बाकी असताना अद्यापही जागा वाटपाबाबत महायुती आणि महाविकास आघाडीत दोन्हीकडं खलबतं सुरू आहेत. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सर्वसाधारण सूत्र ठरलेलं असल्याकारणानं जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच पक्ष धडपडत असल्याचं बघायला मिळतय. राज ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर 'किंग नाही तर निदान किंग मेकर बनायचं असल्यास जास्त आमदार निवडून आणावे लागतील'.
जास्तीत जास्त जागा लढवणं क्रमप्राप्त : 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत. तर 23 नोव्हेंबरला निकाल घोषित केले जातील. या निकालानंतर राज्यात महायुती अथवा महाविकास आघाडी यापैकी एकाला बहुमत मिळालं तरीसुद्धा जागांच्या आकड्यांचा खेळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. स्वबळावर कुठलाही पक्ष राज्यात सत्ता स्थापन करू शकत नाही. कारण सत्ता स्थापनेसाठी राज्यात 145 हा जादुई आकडा आहे आणि आताच्या घडीला कुठलाच पक्ष इतक्या जागा स्वतंत्र लढवत नाहीये. भाजपानं जरी तो प्रयत्न केला तरी त्यांच्या 145 जागा निवडून येणं शक्य नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. याकरता निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद असा फॉर्म्युला समोर येऊ शकतो.
सर्वाधिक जागा असूनही मुख्यमंत्रीपद हुकलं : 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. भाजपाच्या सर्वाधिक 105 जागा निवडून आल्या होत्या. परंतु, भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला आणि युती तुटली. त्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं. त्यामुळंच निकालानंतर राजकीय समीकरणं काहीही होवोत. परंतु, आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त जागा लढवणं क्रमप्राप्त आहे. यासाठी सर्वच पक्षांची धडपड सुरू आहे.
भाजपा मुख्यमंत्रिपदाचा प्रबल दावेदार : राज्यात भाजपा सर्वात जास्त 150 ते 160 जागा लढवण्याच्या तयारीत असून त्यांच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यास महायुतीत भाजपाचाच मुख्यमंत्रीपदावर दावा राहील यात कुठलीही शंका नाही. राज्यात एकनाथ शिंदे यांच्याकडं केवळ 40 आमदार असतानाही भाजपानं मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात बांधली. त्यामागे भाजपाची वेगळी रणनीती होती. परंतु, आता ती परिस्थिती राहिली नाही. अजित पवार गट सुद्धा जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या तयारीत असला तरी त्यांचा आकडा 60 ते 65 जागांपेक्षा वर जाण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच महायुतीत भाजपा मुख्यमंत्रीपदाचा प्रबल दावेदार आहे.
शंभरी गाठण्याचा प्रयत्न : दुसरीकडं महाविकास आघाडीत आतापर्यंत तिन्ही पक्षांना प्रत्येकी 85-85-85 जागांचं वाटप करण्यात आलय. उरलेल्या 33 जागांपैकी जास्तीत जास्त जागा आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षाकडून होतोय. या 33 जागांमध्ये मित्र पक्षांनाही सामावून घ्यायचंय. निवडणुकीच्या निकालानंतर अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास मित्रपक्ष आपल्या बाजूनं कसे राहतील याकडं देखील आतापासूनच लक्ष दिलं जातय. शेवटी या सत्तेच्या खेळात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची आहे. यामुळंच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं त्याचबरोबर काँग्रेसनंही जागा वाटपात शंभरी गाठण्याचा दावा केलाय.
हेही वाचा -