मुंबई - भाजपाने विधानसभेच्या अध्यक्षपदावर राहुल नार्वेकरांची वर्णी लावल्यावर आता विधान परिषदेचे सभापती पद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. परंतु या पदावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचाही डोळा आहे. विधानसभेचे अध्यक्षपद भाजपाकडे गेल्यानंतर विधान परिषदेचे सभापतीपद आपल्याकडे खेचण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात स्पर्धा सुरू झालीय. तर या दोघांच्या भांडणात विधानसभा अध्यक्षपदाबरोबर विधान परिषद सभापतीपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष रणनीती आखत आहेत. परंतु या पदावरून तिघांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली असून, सहजासहजी या पदावर तोडगा निघण्याची चिन्हं कमी आहेत.
राम शिंदे भाजपाकडून प्रबळ दावेदार : महायुतीत भाजपा मोठा भाऊ असल्याने साहजिकच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने राहुल नार्वेकरांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदावर नियुक्ती केलीय. यानंतर भाजपाने पुन्हा विधान परिषद सभापती पदावरसुद्धा आपला दावा केलाय. या पदासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने धनगर समाजाचे विधान परिषदेचे सदस्य राम शिंदेंच्या नियुक्तीला संमती दर्शवली असल्याची चर्चा आहे. मागच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राम शिंदे यांच्या नियुक्तीला संमती दिली होती. कर्जत-जामखेड मतदारसंघातून यंदा विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी निसटत्या मताने राम शिंदे यांचा पराभव केला होता. तरीही राम शिंदे यांची सभापतीपदी वर्णी लागावी, यासाठी भाजपाच्या गोटातून हालचाली सुरू झाल्यात.
रामराजे निंबाळकरांच्या नावास विरोध : दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या एका सदस्याला विधान परिषदेचं सभापती करायचं ठरवलंय. अजित पवार यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांना सभापतीपदाचा शब्द दिला होता. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत रामराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा होती. परंतु लोकसभा निवडणुकीत माढा, सोलापूर या भागात रामराजे निंबाळकर यांचा प्रभाव असतानासुद्धा त्यांनी महायुतीचे लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. या कारणाने रामराजे निंबाळकर यांना सभापतीपद देण्यास भाजपासोबत शिवसेना एकनाथ शिंदे यांचाही मोठा विरोध आहे, अशा परिस्थितीत अजित पवार यात कशा पद्धतीची मनधरणी करतात हे बघणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.
महायुतीला अनपेक्षित मतदान : यंदाच्या महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलेल्या एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद सभापती पदासाठी आग्रह धरला आहे. या पदासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच नाव निश्चित करण्यात आलंय. या पदासाठी एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा निवडणूक होण्यापूर्वीच तयारी केली गेल्याचंसुद्धा म्हटलं जातंय. याविषयी बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले आहेत की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळेल, असा अंदाज महायुतीच्या तिन्ही नेत्यांना होता. परंतु जनता छप्पर फाडके महायुतीला मतदान करेल, असा अंदाज कुणालाही नव्हता. त्यातही एकट्या भाजपाने 132 आमदारांची मजल मारलीय. याच कारणाने महायुतीचीही काही समीकरण बदलली गेलीत. यामध्ये सर्वात जास्त वरचढ भाजपा ठरला असल्या कारणाने अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना आपला हात आखडता घ्यावा लागत आहे.
यंदा 6 विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड हे विजयी झालेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचाही विजय झालाय. अशा परिस्थितीत आता विधान परिषदेच्या आणखी 6 जागा रिक्त झाल्याने एकूण रिक्त जागांची संख्या 33 झालीय.
हेही वाचा-