मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कल हाती येऊ लागला असून, पश्चिम महाराष्ट्रातूनही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळत असल्याचं दिसतंय. पश्चिम महाराष्ट्र हा कायमच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. परंतु राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर राष्ट्रवादीचेच उमेदवार आता राष्ट्रवादीच्याच विरोधात लढत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 40 जागांवर थेट सामना होत आहे. तसेच हाती आलेल्या कलांनुसार अजित पवारांची राष्ट्रवादी 34 हून अधिक जागांवर आघाडीवर असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 15 जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालात पुतणे अजितदादा काका शरद पवारांवर भारी पडत असल्याचं चित्र आहे.
स्वरा भास्करचे पती फहाद अहमद आघाडीवर- मुंबईतल्या अणुशक्ती नगर मतदारसंघातून सध्याच्या घडीला स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांना 20 हजारांहून अधिक मतं मिळत असल्याचं चित्र असून, सना मलिक यांनाही 18866 मतं सध्याच्या घडीला मिळताना दिसतायत. तसेच रायगडातील श्रीवर्धन मतदारसंघातून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे 40 हजारांहून अधिक मतांनी पुढे असून, प्रतिस्पर्धी शरद पवार गटाच्या अनिल नवगणे हे पिछाडीवर जात असल्याचं पाहायला मिळतंय. जुन्नर मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजितदादा)चे अतुल बेनके विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार)चे सत्यशील शेरकर यांच्यात सामना असून, इथे अपक्ष उमेदवार शरददादा सोनावणे आघाडीवर असल्याचं दिसतंय.
इंदापुरातून दत्तात्रय भरणे आघाडीवर - आंबेगावातून राष्ट्रवादी (अजितदादा) दिलीप वळसे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) देवदत्त निकम यांच्या लढत होत असून, दिलीप वळसे पाटील आघाडीवर असल्याचं दिसतंय. शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरद पवार) अशोक पवार विरुद्ध राष्ट्रवादी (अजितदादा) ज्ञानेश्वर कटके यांच्यात सामना आहे. तसेच इंदापूरमधून दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील, बारामतीतून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार, पिंपरीतून अण्णा बनसोडे विरुद्ध सुलक्षणा शिलवंत, वडगाव शेरीतून सुनील टिंगरे विरुद्ध बापूसाहेब पठारे, हडपसरमध्ये चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप, अकोलेत किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे, कोपरगावात आशुतोष काळे यांच्या विरुद्ध संदीप वर्पे, पारनेरमध्ये राणी लंके विरुद्ध काशीनाथ दाते, नगरमध्ये संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर, माजलगावात प्रकाश सोळंखे विरुद्ध मोहन जगताप, बीडमध्ये संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर, आष्टीत बाळासाहेब आजबे विरुद्ध मेहबूक शेख, परळीत धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख, अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील विरोधात विनायक जाधव, उदगीरमध्ये संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव, माढ्यात अभिजित पाटील विरुद्ध मीनल साठे, मोहोळमध्ये यशवंत माने विरुद्ध राजू खरे, फलटणमध्ये दीपक चव्हाण विरुद्ध सचिन कांबळे, वाईमधून मकरंद पाटील विरुद्ध अरुणा पिसाळ अशी लढत आहे.
शेखर निकम विरुद्ध प्रशांत यादव अटीतटीची लढत- चिपळूणमध्ये अजित पवार गटाकडून शेखर निकम विरुद्ध शरद पवार गटाकडून प्रशांत यादव निवडणूक लढवतायत. चंदगडमध्ये राजेश पाटील विरुद्ध नंदिता बाभुळकर, कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे, इस्लामपुरात जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील, तासगावात रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील, सिंदखेडराजामध्ये राजेंद्र शिंगणे विरुद्ध मनोज कायंदे, मोर्शीत देवेंद्र भुयार विरुद्ध गिरीश कराळे, तुमसरमध्ये राजू कारेमोरे विरुद्ध चरण वाघमारे, अहेरीत धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध भाग्यश्री आत्राम, पुसदमध्ये इंद्रनील नाईक विरुद्ध शरद मैंद, वसमतमधून राजू नवघरे विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर, येवल्यातून छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे, सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे, दिंडोरीत नरहरी झिरवळ विरुद्ध सुनीत चारोसकर, शहापुरात दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग वरोरा, मुंब्रा-कळव्यात जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला या 40 जागांवर दोन्ही राष्ट्रवादीत लढत सुरू आहे.
हेही वाचा