ठाणे : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीनंतर सरळ त्यांचे साताऱ्याचे मूळ गाव दरे गाठलं होतं. दोन दिवस मुक्काम केल्यानंतर शिंदे ठाण्यात परतलेत. विशेष म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री दरे गावी पोहोचल्यानंतर ते आजारी पडल्याची माहिती आता समोर आलीय. त्यांच्यावर दरे गावी उपचार सुरू होते. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर आज एकनाथ शिंदे ठाण्यात रेमंड हेलिपॅडवर उतरलेत. यावेळी ह्याच हेलिपॅडवर एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांच्यात पुढील वाटचालीबद्दल चर्चादेखील झालीय. या चर्चेनंतर एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत ठाण्यातील घरी रवाना झालेत. एकनाथ शिंदे ठाण्यात पोहोचण्याआधीच उदय सामंत हेदेखील याच हेलिपॅडवर उतरलेत.
माझी तब्येत ठीक, मी आता बरा आहे - शिंदे : ठाण्यात उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले असता, मी आता ठीक असून, माझी तब्येत बरी आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. विशेष म्हणजे ठाण्यातल्या घरी पोहोचल्यानंतर ठाण्यातील डॉक्टर हे एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची तपासणी करणार आहेत.
हेलिकॉप्टर श्रीकांतला घेऊन पुन्हा रवाना : एकनाथ शिंदे यांना ठाण्यात सोडल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे हे त्याच हेलिकॉप्टरमधून पुन्हा झेपावले आहेत. ते मुंबईच्या दिशेने हेलिकॉप्टर घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी या वेळेस दिली. दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू असताना दीपक केसरकर, उदय सामंत, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे काही काळ एकत्र राहिल्याने चर्चा करताना दिसलेत.
आरामासाठी मी गावी आलो : विशेष म्हणजे ठाण्यात येण्यापूर्वी दरे गावातून तब्बल दोन दिवसांनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबत सविस्तर संवाद साधला होता. "माझी तब्येत ठीक आहे. आरामासाठी मी गावी आलो होतो. अडीच वर्षात मी सुट्टी घेतली नाही. निवडणूक काळातही खूप मेहनत घेतली होती. त्यामुळं थोडा आराम करण्यासाठी मी गावाला आलो होतो," अशी प्रतिक्रिया काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावात पत्रकारांसोबत बोलताना दिली होती. दोन दिवसानंतर त्यांनी आज प्रतिक्रिया दिली होती.
हेही वाचा -