मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला असून, या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय. शिवसेना ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे 10 आमदार निवडून आलेत. दुसरीकडे महायुतीत भाजपाला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्यात. त्यामुळे महायुतीने 234 जागांवर मजल मारलीय. निवडणूक निकालाच्या आधी महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळेल आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल, असं भाकीत केलं जात होतं, जाणकार आणि तज्ज्ञांचासुद्धा असा दावा होता. मात्र या उलट जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलंय.
ईव्हीएम आणि पोस्टलमध्ये मोठी तफावत : निकाल महायुतीच्या बाजूनं लागल्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तसेच हा निकाल आम्हाला मान्य नसून मतदान बॅलेट पेपरवर पुन्हा घेतलं पाहिजेस अशी मागणी विरोधकांनी केलीय. दरम्यान, ईव्हीएमच्याविरोधात महाविकास आघाडी आंदोलनाच्या पवित्र्यात असताना पोस्टल मतदान आणि ईव्हीएम मतदान यांच्यात एवढी मोठी तफावत कशी आहे? या दोन्हीमध्ये ट्रेंड कसा बदलला, याबाबत वरूण सरदेसाई यांनी माहिती दिलीय. काल त्यांनी मुंबईतील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनवरून निवडणूक आयोगावर टीकास्त्र डागले.
एवढा मोठा फरक कसा? : निकालाच्या सुरुवातीला काही कल महाविकास आघाडीच्या बाजूंनी लागत होते. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडी पुढे होती. असे असा निकाल येत होते. मात्र सायंकाळी पाचनंतर निकालाच्या आकडेवारीत एवढी मोठी तफावत कशी आली? हे समजत नाही. पोस्टल मतमोजणीमध्ये महाविकास आघाडी 143 आणि महायुती 140 जागांवर आघाडीवर असतील तर ईव्हीएम मतमोजणीमध्ये महाविकास आघाडी 46 आणि महायुती 230 जागांवर एवढी मोठी तफावत कशी काय येऊ शकते? असा सवाल वरुण सरदेसाई यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
वरुण सरदेसाईंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल : पोस्टल मतदान ते ईव्हीएम एवढा मोठा ट्रेंडचा फरक कसा काय पडू शकतो? असा सवाल वरुण सरदेसाई यांनी निवडणूक आयोगाला विचारलाय. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी, शासकीय कर्मचारी, वयोवृद्ध नागरिक, देशाचे सैनिक, शिक्षक आदी पोस्टल बॅलेटवर मतदान करतात. त्याच पोस्टल बॅलेटवर आम्ही पदवीधर आणि सिनेट निवडणूक जिंकतो. मग विधानसभा निवडणुकीत एवढी मोठी तफावत कशी? असा संतप्त सवाल सुद्धा वरुण सरदेसाई यांनी उपस्थित करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय.
पोस्टल-ईव्हीएमचा खेळ!@SardesaiVarun pic.twitter.com/4k97mpzxkv
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 2, 2024
ईव्हीएममध्ये घोळ : वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून घेतलेल्या आकडेवारीवरून मोठी स्क्रीन लावत माध्यमासमोर एक प्रेझेंटेशन दिले. यात पोस्टल मतदान आणि ईव्हीएम मतदान यांच्यात कसा फरक आहे, कशी मोठी तफावत आहे, याची सविस्तर आकडेवारीनुसार माहिती दिली. यावेळी त्यांनी वरळी विधानसभेतील आदित्य ठाकरे यांना 874 एवढे पोस्टल मतदान झाले तर ईव्हीएम मतदानात 62,450 मते मिळाली. मिलिंद देवरांना 522 पोस्टल मते मिळाली तर ईव्हीएम मतदान हे 54001 एवढे झाले. यात असे दिसते की, पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. हाच ट्रेंड वांद्रे पूर्व माझ्या मतदारसंघात पण आहे. मला 24 टक्के पोस्टल मतदान आहे. मात्र ईव्हीएममध्ये आमच्या मतांमध्ये घट झालीय. केवळ हे महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षासोबत झालंय. पोस्टल मतात नाना पटोले 54 टक्के मतांनी पुढे आहेत तर ईव्हीएम मतांमध्ये त्यांना 12 टक्क्यांची घट झालीय. हे असे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी घडलेत. त्यामुळे पोस्टल मतदान ते ईव्हीएम मतदान याच्यात एवढी मोठी तफावत कशी? याचे उत्तर निवडणूक आयोगाने आम्हाला द्यावे, अशी मागणी यावेळी आमदार वरुण सरदेसाई यांनी केलीय.
हेही वाचा