मुंबई- राज्य विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळालीय. राज्यातील सर्व 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. त्यानंतर आज मतमोजणी पार पडलीय. यावेळी भाजपाच्या स्नेहा पंडित दुबे यांनी 6 वेळा आमदार राहिलेल्या बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केलाय. स्नेहा पंडित यांना 77553 मतं मिळाली असून, प्रतिस्पर्धी हितेंद्र ठाकूर यांना 74400 मतं मिळालीत. स्नेहा पंडित दुबे 3,135 मतांनी विजयी झाल्यात.
ठाकूरांचा 3135 मतांनी पराभव: महाराष्ट्रात असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे भाजपाला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. यापैकी एक म्हणजे वसई विधानसभा मतदारसंघ जिथे भाजपा असो की शिवसेना, कुणालाही खाते उघडता आलेले नाही. यामुळे ही लढत आणखीनच अटीतटीची झाली होती. या निवडणुकीत भाजपाने स्नेहा पंडित दुबे यांना उमेदवारी दिली. हितेंद्र ठाकूर यांच्याशी लढत देत त्यांनी विजय मिळवलाय. तर काँग्रेसने विजय गोविंद पाटील यांना रिंगणात उतरवले होते. भाजपाच्या स्नेहा पंडित दुबे यांनी 6 वेळा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा 3135 मतांनी पराभव केल्यानं ते जायंट किलर ठरल्यात. हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर निवडणुकीच्या वेळेस पैसे वाटप केल्याचा आरोपही या निवडणुकीतून मतदारांनी फोल ठरवून दाखवलाय.
कोण आहेत हितेंद्र ठाकूर? : हितेंद्र ठाकूर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नाव आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा महाराष्ट्रातील वसई-विरार भागात बऱ्यापैकी प्रभाव आहे. ते पालघर जिल्ह्यातील वसई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांच्या कुटुंबाचे व्यवसायातही चांगले नाव आहेत. त्यांचे कुटुंब विवा ग्रुप ऑफ कंपनीज आणि विवा ट्रस्ट नियंत्रित करते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार विजयी झाले होते. खुद्द हितेंद्र ठाकूर विजयी झाले होते. त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूरही निवडणुकीत विजयी झाला होता. तिसऱ्या जागेवर राजेश पाटील विजयी झाले होते. हितेंद्र ठाकूर यांनी यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली होती. एकेकाळी ठाकूर कुटुंबावरही दाऊद टोळीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.
हेही वाचा -