नागपूर Maharashtra Assembly Election 2024 : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस पक्षानं दमदार कामगिरी केलीय. त्यामुळं विधानसभा निवडणूकीमध्ये सर्वाधिक जागेवर काँग्रेस पक्ष दावा करण्याची शक्यता आहे. नागपूर शहरात विधानसभेच्या सहा जागा आहेत. या सर्व जागांवर काँग्रेस लढण्यास इच्छुक असल्याचा दावा पश्चिम नागपूरचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केलाय. त्यामुळं महाविकास आघाडीत नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. रामटेक लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या पत्नी रश्मी बर्वे यांनी रामटेक विधानसभेच्या जागेवर दावा सांगितला होता. त्यामुळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते नाराज झाले होते. त्यानंतर आता विकास ठाकरे यांनी तसाचं दावा केला आहे.
नागपूरच्या सर्व सहा जागेवर आमची ताकत : "राज्यात कुणाला किती जागा मिळतील? हा विषय काँग्रेस पक्षश्रेष्ठीचा आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. नागपूरचा अध्यक्ष म्हणून मला वाटतं, की नागपूर शहरातल्या सर्व सहा जागांवरही आतापर्यंत काँग्रेसच लढत आली आहे. काँग्रेसनं चांगली मतं घेतली आहे. प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसला 50 हजारांच्यावर मताधिक्य मिळालं असल्यानं या जागांवर आमचा दावा मजबूत असल्याचं" विकास ठाकरे म्हणाले.
जिथं ज्यांची ताकद तिथं त्यांचा उमेदवार : "महाविकास आघाडीचे घटक पक्ष तिकीट वाटप करतताना नक्की विचार करतील. जिथं ज्या पक्षाची सर्वाधिक ताकत आहे, तिथं त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे. त्या नुसार नागपूर शहरांमध्ये काँग्रेसचा बेस आहे. लोकसभेमध्ये सव्वा पाच लाख मतं आम्ही घेतली आहे. प्रत्येक मतदार संघामध्ये मताधिक्य काँग्रेसचं आहे. आतापर्यंतच्या ज्या ज्या विधानसभा झाल्या, तिथं लढत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशीच झाली. त्यामुळं या सहाही जागा काँग्रेसलाच मिळाला पाहिजे", असं त्यांनी सांगितलं.
पूर्व इतिहास बघून निर्णय होईल : "विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष दावा करणार आहे. पण आमचे पक्ष सर्व प्रमुख बसतील, त्यावेळी त्यांच्यासमोर नागपूरचं गणित मांडलं जाईल. आतापर्यंतच्या पाच-दहा विधानसभामध्ये या सहाही मतदार संघामध्ये कोणी किती मतं घेतलं याचं मूल्यांकन केलं जाईल. त्यावेळी या सर्व जागा काँग्रेसच्या पारड्यातचं पडतील", असं देखील आमदार विकास ठाकरे म्हणाले.
शरद पवार गट, ठाकरे गटाला हवी नागपुरात एक तरी जागा : नागपूर शहरातील सर्वच्या सर्वच सहा जागांवर काँग्रेसकडून दावा करण्यात आल्यामुळं आता महाविकास आघाडीतील उर्वरित दोन्ही प्रमुख घटक पक्ष नाराज होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पूर्व, पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष देखील नागपूरच्या एका जागेवर दावा सांगण्याची शक्यता आहे.
'हे' वाचलंत का :