ठाणे - ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उभे ठाकलेल्या ठाकरे गटाच्या केदार दिघे यांच्यासह आठ जणांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोपरीच्या अष्टविनायक चौकात पकडलेल्या वाहनात विदेशी मद्य आणि पैशांनी भरलेली 26 पाकिटे आढळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलंय. दरम्यान, गाडीच्या तपासणीत काहीही आढळले नसताना जाणीवपूर्वक आपले नाव या प्रकरणात गोवल्याचा आरोप दिघे यांनी केलाय.
कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल- कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केदार दिघे हे निवडणूक लढवत आहेत. दिघे यांच्याविरोधात शिंदे गटातील एका महिला पदाधिकाऱ्याने कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनुसार, बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास कोपरी येथील अष्टविनायक चौकात एका वाहनाची तपासणी करण्यात आलीय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन गोरिवले नावाच्या कार्यकर्त्यांच्या या वाहनामध्ये मद्य आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली २६ पाकिटे आढळलीत. या तक्रारीनुसार केदार दिघे यांच्यासह सचिन गोरिवले, प्रदीप शेंडगे, रवीद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवले, अनिता प्रभू, पांडुरंग दळवी, ब्रीद या कार्यकर्त्यांवर कोपरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती कोपरी पोलीस ठाण्याचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिलीय.
गाडीमध्ये काही सापडले नाही - केदार दिघेंनीही या प्रकारानंतर एकनाथ शिंदेंवर पलटवार केलाय. कोपरी-पाचपाखाडीत ज्यांनी पैशांचा महापूर आणला आहे, जे साड्या वाटप करीत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. मात्र माझी गाडी तपासतानाचा व्हिडीओ समोर आलाय. त्या व्हिडीओत गाडीमध्ये काही सापडले नाही हे स्पष्ट दिसतंय. मात्र तरीही जाणीवपूर्वक काल रात्रीच्या घटनेनंतर आज सकाळी गुन्हा दाखल होतोय. यामध्ये केवळ मला बदनाम करण्याचा हेतू असून, पैशांचा महापूर आणणाऱ्या आणि साडी वाटप करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे, असंही केदार दिघेंनी म्हटलंय.
हेही वाचा :