मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी अन् विरोधकांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. चांदिवलीतील काँग्रेसचे उमेदवार आरिफ नसीम खान यांनीसुद्धा विद्यमान आमदार दिलीपमामा लांडे यांच्यावर हल्लाबोल केलाय. स्वतःच्या स्वार्थासाठी वारंवार पक्ष बदलणाऱ्या स्थानिक आमदाराविरोधात मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. संधिसाधू आमदार म्हणून त्यांची ओळख झालीय. मनसेत असताना राज ठाकरेंसोबत आणि नंतर शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी गद्दारी केलीय, अशी टीका महाविकास आघाडीतर्फे चांदिवली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आरिफ नसीम खान यांनी केलीय. गेल्या निवडणुकीत माझा 409 मतांनी पराभव झाला होता, त्याचा फटका नागरिकांना बसलाय, त्यामुळे या निवडणुकीत आपला मोठ्या मताधिक्क्याने विजय होईल, असा विश्वास आरिफ नसीम खान यांनी व्यक्त केलाय. काँग्रेसच्या आरिफ नसीम खान यांची विशेष मुलाखत ईटीव्ही भारतनं घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते.
महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण : मुंबईसह पूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून, महाविकास आघाडीची लाट असल्याचा दावा करत 23 नोव्हेंबरला राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असे भाकीत त्यांनी वर्तवलंय. नागरिकांमध्ये फूट पाडून, जातीजातीमध्ये भांडणं लावून मते मिळवण्याचा भाजपाचा नेहमीचा मार्ग आहे. खोटे बोल पण रेटून बोल हे भाजपाचे धोरण आहे. त्याप्रमाणे ते काम करत आहेत. मात्र आम्हाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
पाच वर्षांत कोणतीही भरीव विकासकामं केली नाहीत : विद्यमान आमदारांनी पाच वर्षांत कोणतीही भरीव विकासकामं केली नाहीत. केवळ भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केलाय. एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारविरोधात देखील मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघात 1200 कोटी रुपयांचा निधी दिल्याचा दावा केलाय, मात्र त्या निधीतून विकास झाल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप खान यांनी केला. मतदारसंघात समस्यांचे डोंगर उभे झालेत. पायाभूत सुविधा मिळवणेदेखील जिकिरीचं असल्याचं ते म्हणालेत. तसेच मतदारांना काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणीव आहे, या मतदारसंघातील मतदारांना गेल्या निवडणुकीतील प्रकाराबद्दल खंत असल्याने या निवडणुकीत मतदार आपल्या पाठीशी उभे असल्याचा दावा नसीम खान यांनी केलाय.
हेही वाचा :