वाशिम : विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि कारंजा विधानसभा मतदार संघात इच्छूक उमेदवारांनी प्रचाराचा धुमधडाका लावला. तर अनेकांनी पक्षाकडे ‘लाॅबिंग’ करण्यावर जोर दिला. स्वपक्षाकडून तिकिट मिळण्याची आशा मावळलेल्या काही दिग्गज इच्छुकांनी तर विरोधी पक्षासोबत जवळीक साधल्याच्या चर्चा रंगत आहेत. सध्या सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या वाढल्यानं कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, याबाबत जिल्ह्यावासियांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सर्वच लागले तयारीला - वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिसोड मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. रिसोड विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथून काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित झनक नेतृत्व करतात. इथे काँग्रेसकडून ते एकमेव उमेदवार आहेत. परंतु महायुतीमध्ये उमेदवारीवरून सस्पेन्स वाढला आहे. भाजपाचे नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे चिरंजीव नकुल देशमुख इच्छुक आहेत. तर भाजपाचे माजी आमदार विजय जाधव यांनीही उमेदवारी मागितली आहे. यासोबतच शिवसेना शिंदे गटानं देखील दावा केला आहे. विधान परिषद सदस्य तथा माजी खासदार भावना गवळी येथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा कुणाच्या वाट्या ला जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
वंचितच्या भूमिकेकडे लक्ष - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांच्यात अकोल्यात नुकतीच बंदद्वार चर्चा झाली. महायुती आणि महाआघाडीतील दिग्गजांच्या भुवया त्यामुळं उंचावल्या आहेत. या मतदार संघात वंचितची मते निर्णायक असल्यानं वंचितच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. वंचितनं वाशिममधून उमेदवार जाहीर केला असला तरी रिसोड आणि कारंजा येथून उमेदवारीची घोषणा न केल्यानं उत्सुकता वाढली आहे.
वाशिम मध्ये जागेचा पेच? - वाशिम मतदारसंघात महायुतीतील भाजपाकडून तीन ते चार प्रबळ दावेदार शर्यतीत आहेत. तर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काॅंग्रेसकडून जागा ही मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीत ही जागा नेमकी कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
बंडखोरीचे संकेत - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात महायुती किंवा महाविकास आघाडीकडून तिकिट न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारही काही जणांनी सुरू केल्यानं बंडखोरी थोपवण्याचं आव्हान पक्षनेतृत्वासमोर राहण्याचे संकेत मिळत आहेत.
कारंजात समिकरण बदलणार? - कारंजा मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीच्या इच्छुकांनी उमेदवारी मिळावी, यासाठी सर्वस्व पणाला लावलं आहे. मात्र अद्यापही कुणाचीच उमेदवारी निश्चित झालेली नाही. स्वपक्षाकडून तिकिट मिळण्यासाठी सर्वच प्रयत्न करूनही उमेदवारीची आशा मावळल्यानं इच्छुकांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी जवळीक साधल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा...