नागपूर Vijay Wadettiwar On Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेता अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला. त्यानंतर आज काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथल्ला यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीला सर्व अनुभवी नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याच्या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सकाळी ते देखील मुंबईला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी "एखाद्या नेत्यानं पक्ष सोडल्यानंतर संपूर्ण पक्ष व्यथित होत नाही," असं स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस नव्यानं उभारी घेईल : "राजकारणात पक्षात बदल होत असतात, नेते जातात आणि येतात. एखादी व्यक्ती पक्ष सोडून गेली, म्हणजे पूर्ण पक्ष व्यथित झाला असं समजण्याचं कारण नाही. या ही परिस्थितीतून काँग्रेस नव्यानं उभारी घेईल. काँग्रेस पक्ष मजबुतीनं उभा राहील," असा आशावाद विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस पक्षातून अशोक चव्हाण यांच्याबरोबर अनेक आमदार आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मी काँग्रेस सोडणार नाही : "माझ्या ही संदर्भात काही वावड्या पसरवण्याचं काम सुरू होतं. रवी राणाची प्रवृत्ती ही निष्ठा बदलून विष्ठा खाण्याची आहे," अशी अत्यंत बोचरी टीका रवी राणा यांच्यावर विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. "मी काँग्रेस सोडून जाणार नाही. मला काँग्रेस पक्षानं खूप काही दिलेलं आहे. आता मला फार काही अपेक्षा नाहीत. शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम करण्याचा निर्धार मी केलेला आहे," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :