मुंबई Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार न दिल्या कारणानं काँग्रेस नेते नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली आहे. नसीम खान यांच्या या भूमिकेनंतर मुस्लिम समुदायाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानं नसीम खान नाराज आहेत. या मतदारसंघातून ते निवडणूक लढण्यास फार इच्छुक होते. तशा पद्धतीची तयारी सुद्धा त्यांनी करायला सुरुवात केली होती. परंतु ऐनवेळी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांनी त्यांची खदखद व्यक्त केली. राज्यात 48 जागांपैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीनं मुस्लिम उमेदवार का दिला नाही? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळं आता मुस्लिम समुदायाचा केवळ मताच्या राजकारणासाठी वापर होतोय का? असा प्रश्न उपस्थित केल्या जातोय.
उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आल्यानं फरक : नसीम खान मांडलेल्या भूमिकेनंतर पुन्हा एकदा अल्पसंख्याकांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. 2019 मध्ये राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी ची सत्ता स्थापन झाल्यानंतर एक निराळे समीकरण तयार झाले. 30 वर्षे भाजपासोबत राहिलेला आणि शिवसेनेसारखा कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कर्ता असलेला शिवसेना पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यानं याचा परिणाम मुस्लिम वोट बँकेवर होणार का? असा प्रश्न निर्माण झाला. यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ धरल्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाकडून अनेक आरोप करण्यात आले. परंतु, भाजपा विरोधातील प्रमुख चेहरा म्हणून उद्धव ठाकरे पुढं असल्याकारणानं मुस्लिम समुदाय सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या साथीला आला. उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचा भाग झाल्यानं महाराष्ट्रात याचा फायदा शिवसेनेला मुस्लिम मतं मिळवण्यात होईल अशी शक्यता निर्माण झाली.
काँग्रेसच्या राजवटीत मुस्लिम प्रश्नांकडं लक्ष : याबाबत बोलताना काँग्रेस नेते हुसेन दलवाई म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत भाजपा सत्तेवर येऊ नये अशी मुस्लिम समाजाची तीव्र भावना आहे. ज्या पद्धतीनं भाजपानं त्यांच्याच लोकांना आपल्या हाताशी धरून शिवसेना पक्ष फोडला हे सर्वश्रुत आहे. या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी भाजपासमोर उभं केलेलं आव्हान हे सुद्धा वाखाणण्याजोगे आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना भाजपानं यावर मुस्लिम लीगची छाप असल्याची टीका केली आहे. भाजपाच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर देत खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अनेकदा मुस्लिम लीग सोबत हात मिळवणी केली असल्याची टीका केली. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यानं दोन्ही पक्षांना याचा निवडणुकीमध्ये फायदा होणार आहे. तसंच मुस्लिम समाजाच्या शिक्षण, रोजगार आणि निवाऱ्याकडे शिवसेना कशा पद्धतीनं पाहते, हे फार महत्त्वाचं आहे. कारण मुंबईत 20 टक्के मुस्लिम समाज हा उच्चवर्गीय असून 80 टक्के मुस्लिम समाज हा झोपडपट्टीमध्ये राहतो. काँग्रेसच्या इतक्या वर्षाच्या राजवटीमध्ये मुस्लिमांच्या प्रश्नांकडं गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही, त्यामुळं महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा बळकट होणं महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्रात मुस्लिमांची लोकसंख्या 14 टक्के : नसीम खान यांनी जरी मुस्लिम उमेदवाराचा मुद्दा उपस्थित केला असला, तरी आता त्यांनी त्या मुद्द्यापासून थोडी फारकत घेतली आहे. विशेष करून मुस्लिम नेत्यांना समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवारीची अपेक्षा असणं यात काही वावगं नाही. परंतु, सध्या राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणाकडं पाहता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला जास्तीत जास्त खासदार निवडून आणणं महत्त्वाचं आहे, अशावेळी उमेदवारीवरून नाराजी नाट्य निर्माण होणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्रात मुस्लिमांची लोकसंख्या ही 14 टक्के आहे. मुंबईतील लोकसभा मतदार संघाचं सांगायचं झालं तर मुंबई दक्षिण मध्ये 21 टक्के, मुंबई दक्षिण मध्य मध्ये 20 टक्के, मुंबई उत्तर मध्यमध्ये 25 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम मध्ये 19 टक्के, मुंबई उत्तर पूर्व मध्ये 16 टक्के तर मुंबई उत्तर मध्ये 9 टक्के इतकी आहे. मुंबईतील विशेषतः मुंबई उत्तर मध्य मधील मुस्लिम समुदायांची संख्या लक्षात घेऊनच नसीम खान यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. नसीम खान हे उत्तर भारतीय असून त्यासोबत मुस्लिम असल्याकारणानं या मतदारसंघातून त्यांचा विजय सोपा झाला असता, असा एक मतप्रवाह त्यांनी निर्माण केला होता.
भारतीय मुस्लिम मतदार परिषदेची नाराजी : मुस्लिम उमेदवाराच्या मुद्द्यावरुन भारतीय मुस्लिम मतदार परिषदेनं लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व नसल्याबद्दल चिंता व्यक्त करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख राजकीय व्यक्तींना उद्देशून एक पत्र जारी केलंय. या पत्रात दिल्ली, गुजरात, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मुस्लिम उमेदवारांची संख्या कमी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. तसंच इंडिया आघाडीनं संसदेच्या एकूण 543 जागांपैकी फक्त 28 जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले असल्याचं सांगण्यात आलंय. यामध्ये काँग्रेस 15, सपा 4, आरजेडी 2, माकप 2, जेकेएनसी 3 आणि आययुएमएल ने 2 उमेदवार दिले आहेत. मुस्लिम मतदार परिषदेनं अशा प्रसंगी हे पत्र पाठवलंय, जेव्हा राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला असून मतदारांना आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी अनेक शकला लढवल्या जाताय. तसंच मतदानाचा दुसरा टप्पा पूर्ण होण्याअगोदर याबाबत निर्णय घेण्याचे ही सांगण्यात आलंय. परंतु देशात आणि राज्यात मतदानाचा दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी पूर्ण झाला असून या पत्राचे उत्तर अद्याप देण्यात आलं नसल्यानं भारतीय मुस्लिम मतदार परिषद याबाबत काय निर्णय घेते, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे.
काँग्रेससाठी ही शरमेची बाब : मुस्लिम उमेदवाराच्या प्रश्नावर बोलताना समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आझमी म्हणाले की, हे फार निराशाजनक आहे. महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात 48 जागांपैकी एकाही जागी मुस्लिम उमेदवार दिला नाही. काँग्रेसचे पूर्व मंत्री, नसीम खान यांनाही उत्तर मध्य मुंबई जागेवरून तिकीट न दिल्यानं त्यांनी सुद्धा आपल्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलाय. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कोणीही मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यासाठी पुढं आलं नाही. तसंच समाजवादी पक्षानं महाराष्ट्रातून महाविकास आघाडीकडं एक जागा मागितली होती. परंतु, काँग्रेसनं राज्यामध्ये बदललेल्या राजकीय समीकरणाचा दाखला देत जागा देण्यास नकार दिला. महाराष्ट्रातील एक प्रमुख पक्ष असून सुद्धा ही शरमेची बाब आहे की, काँग्रेस एकाही मुस्लिम उमेदवाराला जागा देऊ शकली नाही, असा टीका अबू आझमी यांनी केली.
इम्तियाज जलील यांचा टोला : तर नसीम खान यांच्या भूमिकेवर बोलताना एमआयएमचे नेते, खासदार, इम्तियाज जलील म्हणाले की, नसीम खान यांना काँग्रेसकडून उमेदवारी भेटत नसेल तर त्यांनी आमच्या पक्षात यावं आणि मुंबईतील कुठल्या जागेवर त्यांना उमेदवारी पाहिजे ते त्यांनी ठरवावं. मुंबईमध्ये जरी आमचे उमेदवार घोषित झाले असतील आणि नसीम खान यांनी मागणी केली तर आमच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेऊन नसीम खान यांना आम्ही उमेदवारी देऊ. जर ते स्वाभिमानी असतील तर त्यांनी असं करावं. अन्यथा आयुष्यभर चटई आणि सतरंज्या उचलण्याचं कामच काँग्रेसमध्ये ते करत राहणार."
हेही वाचा -
- मुंबईतील 'या' भागात मागील वीस वर्षांपासून एकही पुढारी मतं मागायला गेला नाही - Lok Sabha Election 2024
- डी गुकेशचा चीनच्या ग्रँड मास्टरसोबत होणारा सामना असेल आव्हानात्मक; प्रशिक्षकांनी उलगडले 'हे' पैलू - D Gukesh Coach Vishnu Prasanna
- विकासाचे मुद्दे ते काँग्रेसकडून होणारे आरोप; भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची विशेष मुलाखत - Murlidhar Mohol Interview