नागपूर Lok Sabha Elections 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही दिवसांत निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील दोन महिने मतदार केंद्रस्थानी असणार आहेत. त्यातच आता सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत देशभरातील वातावरण राजकीय रंगात रंगणार आहे. पुढारी, अभिनेते, कार्यकर्ते दोन महिने मतदारांकडं मतदान करण्याची विनंती करणार आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षात पक्षानं, तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात काय काम केलं, याबद्दल आज आपण आढावा घेणार आहोत.
नागपूर शहराची ऐतिहासिक ओळख : नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणुनही ओळखलं जात. नागपूर महाराष्ट्रातील तिसरं मोठं शहर आहे. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेलं या शहरात भारतातील शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरला भारताची टायगर कॅपिटलदेखील म्हणतात. या भागातील संत्री प्रसिद्ध असल्यानं नागपूरला ऑरेंज सिटी म्हणूनही नालौकिक आहे. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातही या शहराचं मोठं योगदान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात नागपुरात काँग्रेसची दोन अधिवेशनं झाली होती. तसंच 1920 च्या नागपूर अधिवेशनापासून असहकार चळवळ उदयास आली. याचं शहरात 1925 मध्ये डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'ची (RSS) स्थापना केली. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली नागपुरात लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
दहा वर्षापासून भाजपाची सत्ता : या शहराचं नेतृत्व दिग्गज राजकीय नेत्यांनी केलंय. त्यात विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनिल केदार, चंद्रशेखर बावनकुळे, नागो गाणार, प्रा. जोगेन्द्र कवाडे इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, दीक्षाभूमी असे प्रमुख पर्यटनस्थळ आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व गेली 10 वर्षे नितीन गडकरी यांच्याकडं आहे. गेल्या वेळी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला होता.
गडकरींच्या विरोधात कोण लढणार निवडणूक : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मात्र, नितीन गडकरी त्याबाबत निश्चिंत असल्याचं दिसत आहे. उलट गडकरींना तगडे आव्हान देऊ शकेल असा उमेदवार काँग्रेस पक्षाकडं नसल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विलास मुत्तेमवार यांच्याबाबत काँग्रेस पुन्हा डावपेच खेळू शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेसच्या गटाला एकत्र करण्याच आव्हान : नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील नागपूरचे आहेत. दुसरीकडं काँग्रेसमधील गटबाजीमुळं आज काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. मुत्तेमवार गट, नितीन राऊत गट, राजेंद्र मुळक गटही सक्रिय असल्यामुळं नागपुरात काँग्रेस विखुरली आहे. त्यामुळं नाना पटोले यांच्यासमोर सर्व गटांना एकत्र करण्याचं आव्हान आहे.
भाजपा काँग्रेस आमनेसामने : गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस पक्षात थेट लढत झाली होती. भाजपाकडून नितीन गडकरी तसंच काँग्रेसकडून नाना पटोले निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी नितीन गडकरी यांना 6 लाख 60 हजार 221 तर, नाना पटोले यांना 4 लाख 44 हजार 212 मते मिळाली होती. तसंच सागर डबरासे यांना 26 हजार 128, मोहम्मद जमाल यांना 31 हजार 757, डॉ.सुरेश माने यांना 3 हजार 421 मतांवर समाधान मानावं लागलं होतं.
गडकरींच्या काळात नागपूरचा विकास : नागपूर शहरात टेकडी गणेश मंदिर, तेलंनखेडी हनुमान, फुटळा तलाव, बेसा येथील गुरु मंदिर, साई मंदिर, बालाजी देवस्थान, कोराडी येथील देवी मंदिर, पारडी येथील भवानी देवी मंदिर अशी पर्यटनं स्थळं आहेत. त्यामुळं विकासाच्या बाबतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशातील इतर मंत्र्यांच्या तुलनेत बरेच पुढे आहेत. नागपूरच्या विकासात त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये उल्लेखनीय असं योगदान दिलं आहे. मेट्रो ट्रेन, जगप्रसिद्ध म्युझिकल फाउंटेन देखील नितीन गडकरी यांच्या काळातचं नावारूपाला आलंय. गडकरी बिनधास्तपणे वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असले तरी, ते कुणावर थेट टीका करत नाहीत. त्यामुळं त्यांचे कुणाशी वाद होताना दिसून येत नाही.
गडकरींनी नाना पटोलेंना केलं चितपट : नागपूर मतदारसंघात शहरातील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये नागपूर उत्तर, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य, नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघाचा समावेश होते. नागपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आहे. 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना मोठा विजय मिळाला होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा बाजी मारली होती. 2014 मध्ये गडकरी यांनी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पराभवाची धूळ चारली होती.
नागपूर शहराची लोकसंख्या : नागपूर शहराची एकूण लोकसंख्या सुमारे 33 लाख आहे. तसंच या शहरात 21 लाख 61 हजार 96 मतदार आहे. त्यापैकी 11 लाख 86 हजार मतदारांनी 2019 मध्ये मतदानाचा हक्क बजावलाय. त्यावेळी 54.88 टक्के अशी मतदानाची टक्केवारी होती. यामध्ये 10 लाख 63 हजार 932 पुरुष, 10 लाख 97 हजार 85 महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय 77 तृतीयपंथी मतदारही आहेत. यात यंदा 1 लाख 16 हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. आगामी लोकसभेचा खासदार ठरवण्यात नव्या मतदारांचा मोठा वाटा असणार आहे. तर संपूर्ण जिल्ह्यात (2014 च्या आकडेवारीनुसार) 12 मतदारसंघात एकूण 37 लाख 4 हजार 676 मतदार आहेत. त्यापैकी 19 लाख 28 हजार 286 पुरुष मतदार असून 17 लाख 76 हजार 337 महिला मतदार आहेत.
सहापैकी चार विधानसभा मतदारसंघावर भाजपाचा कब्जा : नागपूर लोकसभा मतदारसंघात शहरातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत. तसंच मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता आहेत. नागपूर महानगरपालिकेत गेल्या काही वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात आहेत.
जातीनिहाय समीकरण : नागपूर लोकसभा मतदारसंघात दलित, मुस्लिम, तेली, कुणबी आणि हलबा जातीचं प्राबल्य आहे. यामध्ये मुस्लिम, दलित तसंच काही प्रमाणात कुणबी काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मराठी मतदार आहेत. तेली तसंच कुणबी मतदारांची संख्या नागपुरात अधिक आहे. त्यापाठोपाठ बौद्ध, हलबा समाजही 30 टक्के आहे. मुस्लिम मतदारांची संख्या अंदाजे 10 टक्के आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व दिसून येत आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात असल्यानं भाजपाला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
समस्या : नागपूर लोकसभा मतदारसंघ 95 टक्के सुशिक्षित आहे. त्यामुळं येथे रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मुत्तेमवारांच्या काळात नागपूरला मिहानसारखा प्रकल्प मिळाला, मात्र पाहिजे तसा विकास झाला नाही. गडकरींच्या काळात मिहानचा विकास झाला, मात्र रोजगार उपलब्ध झाला नाही. गडकरींच्या कार्यकाळातही मिहानचा विकास झालेला नाही. त्याचा थेट परिणाम रोजगारावर झाला आहे. मिहानमध्ये लाखो तरुणांना रोजगार दिल्याचा केंद्रीय मंत्री गडकरींचा दावा आहे. नागपूर शहराच्या बाह्य भागात पाण्याचं संकट कायम आहे. शहरात 24 तास पाणी देण्याचा गडकरींचा दावा फोल ठरल्याचं मतदारांचं मत आहे.
हे वाचलंत का :